धुळ्याच्या विकासासाठी भाजपाच्या हाती महापालिकेची चावी

0

धुळे (राहुल जगताप) – धुळे महापालिकेच्या निवडणुकीत दोन प्रकारची मानसिकता ठळकपणे दिसून आली. एक मानसिकता अशी होती की धुळ्याचा विकास झाला पाहिजे. हा विकास आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या हातातून घडो किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाला पाहिजे यात दुमत नाही. दुसरी मानसिकता होती पैसे मिळाल्याशिवाय मतदानाला जायचं नाही. जो उमेदवार आपल्याला पैसे देईल त्याला मतदान करायचे, कोणताही पक्ष सत्तेत आला तरी विकास होईल का याची काळजी करण्याची गरज नाही. अनेक वर्षापासून हीच स्थिती कायम आहे,त्यात मोठा बदल होणार नाही त्यामुळे पैसे घेऊन मतदान करावे. ही दोन प्रकारची मानसिकता भाजपने ओळखली होती. ह्या दोन मानसिकतेवर भाजपने वेळीच दणका दिला. भाजप धुळे पालिकेवर सत्ताधीश झाला. हे सत्य नाकारता येत नाही कारण , मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी लक्ष्मी दर्शन घेण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या होत्या, ही स्थिती कुठेही रेकॉर्ड नसली तरी मतदाराने आपले मत विकले हे धुळेकरांच्या डोळ्यात आणि मनात कायमस्वरूपी राहणार आहे. भाजप आणि कार्यकर्त्यांनी या परिस्थितीकडे योग्य पद्धतीने, अभ्यासपूर्ण नियोजन करून धुळेकरांच्या मानसिकतेवर कब्जा केला. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत जात, धर्म,लिंग, भाषा, असा कुठल्याही विषय प्रचारात नव्हता फक्त विकास हा एकमेव मुद्दा सर्व पक्षांनी जनतेसमोर ठेवला होता. मात्र असे असताना भाजपने हा विकास योग्य पद्धतीने लोकांसमोर सादर केला .परिणामी एक हाती सत्ता काबीज करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला. हे गणित जुळून आले धुळेकरांच्या मानसिकतेवर भाजपतर्फे करण्यात आल षटकार ठरला.

हे निवडणूक धुळेकरांना अंतर्मुख करणारी ठरली. भाजपचे आमदार अनिल अण्णा गोटे यांनी मंत्री डॉ. सुभाष भामरे मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध एकाकी लढा उभा केला तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या धुंदीत मग्न होते. शिवसेनेने देखील गोटे यांना टाळी दिली होती मात्र ही स्थिती असताना भाजप 50 जागांवर निवडून आले. निवडणूक जिंकण्याची विद्या भाजपकडे आहे की धुळेकरांना मोहिनी घातली होती. जादूगाराने जादूचा खेळ दाखवा असा प्रकार धुळ्यात पाहण्यास मिळाला. भाजपने जादूची कांडी फिरवली अन, रात्रीतून सत्ता हातात घेतली. धुंद धुळेकरांना धुळे शहरात मतदान झाल्यानंतर हे निवडणूक त्रिशंकू होईल असा अंदाज दिग्गजांनी वर्तविला होता त्याचप्रमाणे गल्लीबोळातील अनेक नागरिकांमध्ये ही चर्चा दिवसभर रंगली होती. भाजपला एक हाती सत्ता मिळेल का? आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या प्रचार आणि गाजलेल्या सभा यामुळे लोकसंग्रामला काही सीट मिळतील असा विश्वास अनेकांना होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष राहील अशीही स्थिती रविवारी मतदानानंतर होती. शिवसेना पाच जागांवर आपली उमेदवारी निश्चित करेल असेही चित्र रंगले होते.

ग्रामीण भागात काँग्रेसची जादू चालणार असेही मत व्यक्त होत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेना आणि अनिल अण्णा गोटे यांचा लोकसंग्राम असे सर्व पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी चर्चा रविवारी धुळ्यात रंगली होती मात्र सोमवारी निकाल जाहीर होताच धुळेकरांना आश्चर्याचा धक्काच बसला. ईव्हीएम मशीन आणि पैसा बोलता है याची चर्चा धुळ्यात दिवसभर रंगली आहे. लोकशाही पद्धतीने भारतीय जनता पक्षाने धुळे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता आणली आहे. धुळेकरांना भाजपकडून मोठ्या अपेक्षा आहेत.धुळ्यातील अनेक रखडलेले प्रकल्प त्याचबरोबर पिण्याचे पाणी, स्वच्छ धुळे ,चौपाटी यासह अनेक कळीचे मुद्दे भाजपने धुळे शहरात सोडवावे अशी माफक अपेक्षा धुळेकरांची आहे.याकडे निवडून आलेल्या उमेदवारांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा विकास हा स्वप्नात राहू नये, हीच
अपेक्षा.