धुळ्यातील अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण

0

धुळे (योगेश जाधव) : शहरातील मुख्य नाले व गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचल्यामुळे तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाल्यांमध्ये कचर्‍याचे ढिग साचल्यामुळे यावर मोकाट कुत्रे व डुकरांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढला असून परिसरात रोगराई पसरली आहे. परिसरातील नागरिकांना मलेरिया, टायफेड, डेंग्यू या सारख्या आजाराची लागन होत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या घाणीपासुन परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून याकडे मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीदेखील दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविणे तसेच इतर विकासकामे करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची सुविधा करणे अपेक्षीत आहे, मात्र मनपा प्रशासन व प्रभागातील लोकप्रतिनिधींना याचा विसर पडल्यामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.

नवीन वसाहतीत गटारीच नाहीत
धुळे शहराचा चहू बाजूने झपाट्याने विस्तार होत आहे. त्याचप्रमाणे नवीन रस्ता व कॉलन्यांची निर्मीती होत आहे. या नवीन वसाहतीत महापालिकाकडून दिल्या जाणार्‍या सुविधांचा वानवा आहे. शहरातील अनेक प्रभागामधील नव्या वसाहतींमध्ये दक्षता कॉलनी,सेवादास नगर, खंडेराव सोसायटी,रामनगर,वाडीभोकर रोड तसेच साक्री रोड वरील नवीन वसाहतींमध्ये गटारी न बांधल्यामुळे घरातील सांडपाणी थेट रस्त्यावरून पसरून सर्वत्र दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे याठीकाणी नागरिकांचे राहणे मुश्किल झाले आहे. या घाणीमुळे पसरलेल्या रोगराईने येथील रहिवाशांचा जीव दगावण्याचे वाट प्रशासन पाहत आहे. अशा संतप्त प्रतिक्रीया परिसरातील नागरिकांच्या आहेत.

निवेदनांना केराची टोपली
याबाबत मनपा प्रशासनास विविध भागातील नागरिकांचे दिवसाआड मोर्चे,धरणे आंदोलन होत असतात. नव्या वसाहती व कॉलनीत राहणार्‍या नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देवूनही प्रशासनाने दखल न घेता निवेदनांना केराची टोपली दाखवले जात असल्याचे त्रस्त नागरिकांचे म्हणने आहे.

धुळे शहरातील कुठेही नाले तुंबलेले नाहीत या संदर्भात आमच्याकडे कोणतीही तक्रार अजून आलेली नाही. एक दोन नाले तुंबले होते त्यांची सफाई करण्यात आली आहे. महापालिकेने नाले सफाईचे काम हाती घेतले आहे. पावसाळा सुरू होण्यापुर्वी संपूर्ण नाल्यांची सफाई करण्यात येईल. नागरिकांना या संदर्भात तक्रार असल्यास मनपा प्रशासनाला कळवावे त्याची दखल तात्काळ घेतली जाईल.
– संगिता धायगुडे, आयुक्त मनपा

आम्ही गेल्या 15 वर्षापासुन या मिल परिसरात राहतो. मात्र अजूनही येथे महानगरपालीकेने गटारींची व्यवस्था केलेली नाही. मुलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. रस्ते व गटारींच्या समस्येमुळे आम्ही त्रासलो आहोत. गटारींची इतकी वाईट अवस्था झाली आहे, त्यामुळे आरोग्याच्या समस्या या परिसरात वाढत आहेत. – अजय सुर्यवंशी

महापालिकेला आम्ही नियमीत कर भरतो पंरतू महापालिका आम्हाला सुविधा पुरवत नाही. गेल्या कित्येक वर्षापासुन आमचे या परिसरात वास्तव्य आहे. परंतू लोकप्रतिनिधी फक्त मते मागण्यासाठीच इकडे हातपाय जोडायला येतात. त्यानंतर कोणी फिरकत पण नाही. रस्ते,गटारी,पिण्याच्या पाण्याची समस्या खुपच गंभीर झाली आहे.
– भगवान पाटील

नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.नियमितपणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून नाला सफाई होत नाही. त्यामुळे सांडपाणी घरांसमोरच साचते आणि दुर्गंधी पसरते, व त्यामुळे रोगराई पसरत आहे. अक्षरश: येथे राहणे कठीण झाले आहे.
– रंजनाबाई मोरे

निगरगट्ट मनपा प्रशासन मुद्दाम या गोष्टींकडे कानाडोळा करत आहे. माझ्या प्रभागातदेखील नाले सफाई महिनो होत नाही. वेळोवेळी मनपाच्या आरोग्य विभागाकडे मी तक्रार केली असुनदेखील त्याकडे दुर्लष केले जाते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न या अस्वच्छतेमुळे निर्माण झाला आहे. गेल्या 20 वर्षापासुन रहिवाशी असलेल्या नविन वसाहती व कॉलन्या मध्ये गटारी व नाल्यांची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परंतू मनपाच्या आरोग्य विभाग याकडे दुर्लष करत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने येत्या काळात गंभीर स्थिती धुळ्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– गंगाधर माळी, विरोधी पक्षनेता,मनपा