चौकशीकामी पत्नी ताब्यात ; मुख्य संशयीत आरोपी पसार
धुळे- शहरातील साक्री रोडवरील शनी मंदिरामागील रहिवासी महेंद्र काशीनाथ परदेशी यांची हत्या करून त्यांचा मृतदेह मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ परीसरातील पेट्रोल पंपाजवळ जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नीला मालेगाव तालुका पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह कृत्यात सहभागी असलले संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट
महेंद्र परदेशी हे गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता तर धुळे-मालेगाव महामार्गावरील मालेगावजवळील चिखलहोळ परीसरातील रीलायन्स पेट्रोल पंपाजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मालेगाव तालुका पोलिसांना 4 रोजी आढळल्यानंतर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मयताच्या वर्णनावरून हा मयत धुळ्यातील महेंद्र परदेशी असल्याचे निष्पन्न झाले होते. मालेगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी मयताची पत्नीला चौकशीकामी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दुजोरा दिला.