महापालिकेतील विरोधी गटनेत्यासह 19 जणांविरुद्ध गुन्हा ; अनेक वाहनांची तोडफोड ; चार आरोपींना अटक
धुळे- शहरातील भंगार बाजारात सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून दोन गट समोरा-समोर भिडल्याने दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला तर अनेक चारचाकीसह दुचाकींची तोडफोड करण्यात आल्याने पळापळ झाली. या घटनेमुळे या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. या प्रकरणी महापालिका विरोधी पक्षनेते साबीर शेख यांच्यासह 19 जणांविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली असून या भागात एसआरपी प्लाटूनचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
किरकोळ कारणावरून उसळली दंगल
शहरातील मौलवीगंज भागातील गल्ली नंबर 14 मधील रहिवासी मोहम्मद आसीफ अहमद हाजी (56) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, मोहम्मद आसिफ यांचा भाऊ आणि पुतण्या यांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारल्याच्या कारणावरुन सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महापालिकेचे विरोधी पक्षनेते साबीर शेख यांचा मुलगा जुनेद, युसुफ तलाखान, रहेयान वसी खान, सामा वसीखान, शोएब लाला खान, ताहीर रहेमतुल्ला खान आणि त्यांच्या सोबतच्या 10 ते 12 जणांनी हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी सळई, रॉड घेऊन मोहम्मद आसीफ यांच्यावर हल्ला चढवला. यात मोहम्मद आसीफसह दोघे गंभीर जखमी झाले. दंगेखोरांनी अन्सार नगर भागात दगडफे करीत सुमारे आठ दुचाकींसह चार चारचाकींची तोडओड केली तसेच शकील मेहंदी हसन यांच्या मालकीच्या एस़ एम़ टायर दुकानाची तोडफोड केली़
पोलिस अधिकार्यांची धाव
घटनेची माहिती कळताच धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि पोलिस कर्मचार्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ या प्रकरणी मोहम्मद आसीफ अहमद हाजी आणि मुबस्सीर खान बरकतुल्लाह खान या दोघांनी परस्पर विरोधी तक्रार दिलेल्या आहेत़ या प्रकरणी महापालिकेचे विरोधी पक्ष नेते साबीर शेख यांच्यासह अन्य जणांविरुध्द हल्लाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत़ दरम्यान, या प्रकरणात चार संशयीतांना अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.