नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने खळबळ
धुळे- परमीट रूमचा स्थलांतर परवाना काढून देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्या धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यालयीन अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणार्या अनंत भावसार नाशिक लालुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार अधिकार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दहिवे, ता.साक्री येथे व्यावसायीकाने परमीट रूमचा स्थलांतर परवान्यासाठी अर्ज केला मात्र त्यापोटी 25 हजारांची मागणी करण्यात आली. व्यावसायिकाने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर निरीक्षक प्रभाकर निकम, डी. टी. धोंडे यांनी अनंत दुल्लभ भावसार (वय 56) यांना शुक्रवारी दुपारी सापळा रचून अटक केली. भावसार हे लघू टंकलेखक आहेत. त्यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. कारवाईनंतर शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे याचकार्यालयात कार्यालयीन अधीक्षक या पदावर असलेले धनंजय मून यांच्यावरही 17 मे रोजी ही कारवाई झाली होती.
अडीच महिन्यात दुसरी कारवाई
दोन्ही कारवायांबाबत नाशिक येथील पथकाकडे तक्रार देण्यात आली होती. भावसार व मून यांच्या रूपाने एकाच पदावरील दोन व्यक्तींवर ही कारवाई झाली. दोघा घटनांमध्ये मद्यविक्रेत्याकडून तक्रार देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर दोन्ही कारवायांमध्ये एकाच अधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.