धुळे । गेल्या काही महिन्यांपासून फाशी पुलावरील गटारीचे काम रखडलेले असून कामाची गती अतिशय मंद असल्याने वाहतुकीची मोठी समस्या उद्भावली आहे. त्यामुळे रोजच याठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात. सर्वसामान्य नागरीक वाहतुकीच्या कोंडीने हैराण झाले आहेत. यासंबंधी वारंवार तक्रारी करुन देखील ही समस्या ’जैसे-थे’च आहे. मनपाच्या या ढिम्म कारभाराच्या निषेधार्थ आज धुळे बार असोसिएशनचे वकील रस्त्यावर उतरले होते. फाशी पुलावरील रखडलेल्या कामाच्या ठिकाणी जावून आंदोलन करण्यात आले. यावेळी धुळे बार असोसिएशनने मनपासह ठेकेदाराचा धिक्कार केला.
प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी
येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संकुलासमोरील गटारीचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. रस्त्याची एकबाजू पूर्णपणे बंद करण्यात आल्याने एकाच मार्गाने वाहतुक सुरु आहे. आधीच हा रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतुकीची मोठी कोंडी होते. शिवाय, बाजूलाच एक मोठा खड्डा असल्याने येथे अनेक अपघात झाले आहेत. याच रस्त्यावरुन वकील, न्यायाधीश, शाळकरी मुले तसेच नागरिकांची ये-जा सुरु असते. याठिकाणाहून मार्गक्रमण करतांना नाकी-नऊ येतात. यासंबंधी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारीही करण्यात आल्यात. परंतु, त्याचा काहीही उपयोग न झाल्याने अखेर या त्रासाला कंटाळून आज धुळे बार असोसिएशनने याठिकाणी आंदोलन करण्याचे ठरविले. त्यानुसार सकाळी 11 वाजेच्या सुमारास बार असोसिएशनची वकील मंडळी याठिकाणी धडकली. कामात दिरंगाई करणार्या ठेकेदारासह मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या आशयाचे फलक वकिलांच्या हातात होते.
मनपा आयुक्तांना दिले निवेदन
याप्रकरणी धुळे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी मोठा अपघात होवून अनर्थ झाल्यास त्यास सर्वस्वी मनपा प्रशासन व ठेकेदारच जबाबदार राहील, असे बजावण्यात आले. लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशार बार संघाचे अध्यक्ष अॅड.शामकांत पाटील, उपाध्यक्ष अॅड.समीर सोनवणे, सचिव अॅड. मधुकर भिसे, अॅड.अमित दुसाणे, अॅड. सुरेश बागले, अॅड. बळीराम वाघ, अॅड.वैशाली देवरे, अॅड. कुणाल जमादार, अॅड. बिपीन मोरे, अॅड. ललित देठे, अॅड. दिलीप मनिखेडकर, अॅड. सचिन जाधव, अॅड.महेंद्र पवार, अॅड. निमिशा बोरसे यांनी दिला आहे.