धुळ्यातील विमा एजंट व अवैध सावकार राजेंद्र बंबच्या लॉकरमधून दहा कोटींचे घबाड जप्त

धुळे : धुळ्यातील अवैध सावकार व विमा एजंट असलेल्या राजेंद्र बंबच्या एका लॉकरमधून शुक्रवारी तपासणीअंती तब्बल 10 कोटी 73 लाखांचे घबाड जप्त करण्यात आले शिवाय विविध देशातील 58 विदेशी चलन ही मिळून आले आहे. यात सुमारे पाच कोटी रुपयांची रोकड आहे. सलग तीन दिवसांपासून कारवाई सुरू आहे. विमा पॉलिसीच्या आडून अनेकांना खाजगी सावकारीच्या सावकारीच्या जाळ्यात अडकवणार्‍या राजेंद्र बंबची सध्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

10 कोटींचे घबाड जप्त
जळगाव पीपल्स बँक पाठोपाठ शिरपूर पीपल्स बँकेतूनही आरोपी राजेंद्र बंब याच्या लॉकर मधून आर्थिक गुन्हे शाखा व सहायक निबंधक यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकत 10 कोटी 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात काही कोरे चेक, खरेदी खत, व सौदा पावतीसह काही डायरी देखील जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांना दिली आहे. आता पर्यंत आरोपी बंब यांच्या कडून सव्वा 15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

असा मुद्देमाल केला जप्त
पाच कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपयांची रोकड व 10 किलो 563 ग्रॅमचे सोने, सात किलो 721 ग्रॅमची चांदी असा पाच कोटी 54 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. एकूण 10 कोटी 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 12 सौदा पावती, 5 मिळकत खरेदी खत, 24 कोरे चेक, 50 स्टॅम्प पेपर, 11 चेक बुक, 3 डायरी, 2 लॉन्ग बुक, असा ऐवज आर्थिक गुन्हे शाखा व सहाय्यक निबंधक यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.