धुळे- शहरातील मिरजकर नगरातील विवाहिता साधना निकम यांच्या आत्महत्येप्रकरणी पती राजेंंद्र निकम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृत साधना यांच्या आई गंगुबाई भागा गांगुर्डे (60, रा देऊर खुर्द, ता.धुळे) यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार सन 1999 मध्ये साधना व राजेंद्र विश्वास निकम यांचा विवाह झाला होता. परंतु सन 2011 पासून साधनाचा छळ केला जात होता. तिच्याकडून सतत पैशांची मागणी केली जात होती. तसेच राजेंद्र याचे नाशिकमध्ये राहणार्या एका महिलेसोबत संबंध आहेत. त्यामुळे साधनाने फारकत द्यावी, यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. या सर्व प्रकाराला कंटाळून साधना हिने रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येला राजेंद्र निकम हे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरुन चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.