धुळ्यातील शंकर मार्केटमधील 40 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी ; कोट्यवधींचे नुकसान

धुळे : धुळे शहरातील गजबजलेल्या पाच कंदील परीसरातील शंकर मार्केटला मंगळवारी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीचा विळखा संपूर्ण मार्केटमध्ये पसरल्याने सुमारे 30 हून अधिक दुकान खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि अग्निशामक बंबाने धाव घेतली. गर्दी पांगण्यासाठी पोलिस प्रशासनाला यावेळी बळाचा वापर करावा लागला.

अनेकांनी घेतली धाव
आग लागल्याची माहिती मिळताच महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समिती सभापती शितल नवले, नगरसेवक नागसेन बोरसे, हर्षकुमार रेलन आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कापड मार्केटला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने अप्रिय प्रकार रोखण्यासाठी भविष्यात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन महापौर प्रदीप कर्पे यांनी दिले.

अग्निशमन दलाची मोठी कसरत
आधीच चिंचोळ्या गल्ल्या आणि दाटीवाटीने वसलेल्या दुकानांमुळे अग्निशमक बंबाला आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या तर इतर दुकानांमधील माल बाहेर काढण्यास दुकानदारांचीदेखील मोठी धांदल उडाली. या आगीत कोट्यवधी रुपयांचा कपड्यांचा माल खाक झाल्याचा अंदाज आहे.