धुळे : अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या आदेशानंतर शहरातील अवैध व्यवसाय चालवणार्यांवर पोलिसांनी अचानक पाच ठिकाणी छापे टाकत 32 आरोपींसह सट्टा-जुगाराची साधने व रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली. पाच स्वतंत्र गुन्हे सट्टा मालकांविरुद्ध दाखल करण्यात आले. सोमवारी दिवसभरात विशेष पथकाने धुळे शहर व देवपूर पोलीस ठाणे हद्दीत दोन तर देवपूर पश्चिम ठाणे अंतर्गत एक कारवाई केली.
पाच सट्टा मालकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे
शहर पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या कारवाईत आरोपी धीरज परदेशीच्या ताब्यातून चार हजार 50 रुपयांची रोकड तर कैलास कोळवले याच्या ताब्यातून तीन हजार 800 रुपयांची रोकड, देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत कैलास चौधरी यांच्या ताब्यातून चार हजार 120 रुपयांची रोकड व 34 हजार रुपये किंमतीचे नऊ मोबाईल,तर कैलास कोळवले यांच्या ताब्यातून 515 रुपये रोख व दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच प्रवीण मिस्तरी यांच्या अड्ड्यांवरून 14 हजार 320 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मिस्तरी हे पसार झाले आहेत.
कारवाईचा धडाका सुरूच राहणार
धुळे शहर व जिल्ह्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनातर्फे यापुढे देखील अशाच पद्धत्तीने धडक कारवाई करण्यात येईल, असे अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.