धुळे । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 32 हजार 202 शेतकर्यांना आतापर्यंत लाभ मिळाला असून पात्र शेतकर्यांच्या खात्यात रुपये 117 कोटी 94 लक्ष 16 हजार 946 रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे सिध्दी 2017- संकल्प 2018 उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक जी. के. अनारसे, उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये, जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, सहाय्यक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत उपस्थित होते.
डिजिटल ई साप्ताहिक यशार्थ
जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्या माध्यमातून डिजिटल ई साप्ताहिक यशार्थचे प्रकाशित केले जात आहे. या साप्ताहिकाचे आतापर्यंत सलग 24 अंक प्रकाशित झाले आहेत. मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, घरकूल योजना, डिजिटल इंडिया, पर्यटन, धुळे जिल्ह्यातील प्रगतीशिल शेतकरी, सेवाभावी संस्था आदी विषयांवर सविस्तर माहिती या अंकांमधून देण्यात आली आहे. या अंकात माझे स्व्त:चे फ्रॉद द डेस्क ऑफ कलेक्टर हे सदर नियमितपणे प्रकाशित होते. पुढील अंक हा रौप्य महोत्सवी अंक असणार आहे. धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नवीन अद्ययावत इमारत पांझरा नदीच्या काठावर सुमारे 20 हजार चौरसफूट क्षेत्रात बांधण्यात येणार आहे. त्यात 12 हजार चौरसफूट बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 3.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांच्यामार्फत होणर आहे. या इमारतीमध्ये विविध कक्ष असतील.
धुळे जिल्ह्याची स्थिती
धुळे जिल्ह्यातील 87 हजार 705 शेतकर्यांनी आपले सरकार पोर्टलवर माहिती भरली आहे. शासन निर्णयानुसार पात्र शेतकर्यांची माहिती 1 ते 66 कॉलमच्या नमुन्यात तयार करण्यात आली होती. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धुळे जिल्ह्यातील 25 हजार 11 शेतकर्यांना आतापर्यंत 68 कोटी 72 लक्ष 16 हजार 946 रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या 7191 शेतकर्यांच्या खात्यात 50 कोटी 22 लक्ष रुपये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
55.70 कोटी रूपयांचा निधी
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2017- 2018 मध्ये 95 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांसाठी 55.70 कोटी रुपयांचा अंमलबजावणी आराखडा प्रस्तावित आहे. यात एकूण 1480 कामांचा समावेश आहे. एकूण कामांपैकी 566 कामांना रुपये 15.56 कोटी रकमेची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. उर्वरित कामांची प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही प्रगतीत असून प्रशासकीय मान्यता कामांची ई- निविदा कार्यवाही प्रगतीत आहे. त्यापैकी 65 कामांना कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आले आहेत. तर 6 कामे पूर्ण झाली आहेत.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना
धुळे जिल्ह्यास 100 कामांचे उद्दीष्ट प्राप्त झाले होते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 24 कामे सुरू आहेत. लोकसहभागांतर्गत 115 शेतकर्यांनी सहभाग नोंदविला आहे. 244639 घनमीटर गाळ काढण्यात आला, तर 2155 हेक्टर क्षेत्रात गाळ टाकण्यात आला आहे. या 24 कामांवर 245.44 लक्ष रुपये खर्च झाले. त्यापैकी इंधनावरील खर्च 119.51 लक्ष व लोकसहभागांतर्गत वाहतूक तसेच मशिनरीचा खर्च रुपये 125.93 लक्ष आहे.
सामाजिक न्याय भवन
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीकरीता सांस्कृतिक सभागृह तसेच संगणक केंद्र, माहिती केंद्र व ग्रंथालय इत्यादी सर्व सुविधांनी युक्त असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व सांस्कृतिक भवन साकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार धुळे शहरातील साक्री रोड परिसरात भव्य असे सामाजिक न्याय भवन साकारण्यात आले आहे. या भवनाचे उदघाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गेल्या वर्षी मे महिन्यात झाले. या कामावर 650 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत.
जलयुक्त शिवार अभियानासाठी 123 गावांची निवड
सर्वांसाठी पाणी- पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र- 2019 अंतर्गत धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. 2015- 2016 करीत निवडण्यात आलेल्या सर्व 129 गावांमधील प्रस्तावित 100 टक्के कामे पूर्ण. एकूण 4858 कामांचा समावेश होता. या कामांवर 115.44 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या कामांमुळे 4370.40 टीसीएम जलसाठवण क्षमता वाढली आहे. प्रत्यक्षात 23686.58 टीसीएम जलसाठा वाढला. या अभियानांतर्गत 2016- 2017 मध्ये धुळे जिल्ह्यातील 123 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांसाठी 132.73 कोटी रुपयांचा अंतिम अंमलबजावणी आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. या आराखड्यात एकूण 2595 कामांचा समावेश आहे. आराखड्यातील एकूण कामांपैकी 2408 कामांना रुपये 110.83 कोटी रकमेच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय मान्यता कामांपैकी 3 जानेवारी 2018 पर्यंत 1651 कामे पूर्ण झाली असून 640 कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत सर्व कामे माहे मार्च 2018 पर्यंत ही कामे पूर्ण करावयाची आहेत. याअंतर्गत सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, ओघळ नियंत्रण, लहान मातीनाला बांध, विहीर पुनर्भरण, रिचार्ज शॉफ्ट, रोपवन वृक्ष लागवड आदी कामे प्रस्तावित आहेत. या अभियानांतर्गत जुलै 2017 अखेर पूर्ण झालेल्या विविध उपचारांमुळे निर्माण झालेली साठवण क्षमता 10119.75 निर्माण झाला असून प्रत्यक्षात 6389.53 टीसीएम जलसाठा तयार झाला आहे.
डिजिटल शाळा
शालेय शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना शाळेी गोडी लावण्यासाठी व अध्ययनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये डिजिटल शाळा उपक्रम राबविण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1103 शाळा असून या सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 2015- 2016 मध्ये 41 लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय लोकसहभाग, शिक्षक, मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे मोठे योगदान लाभले आहे. डिजिटल शाळेमुळे जिल्हा परिषद शाळांचे रंगरुप पालटले आहे. रंगरंगोटी, तक्ते, चित्रे यामुळे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांना आकर्षित करू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. देसले यांनी सांगितले, जिल्हा परिषद शाळांबरोबरच खासगी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू शाळा डिजिटल होत आहेत. आतापर्यंत 300 खासगी शाळा डिजिटल झाल्या जिल्हा परिषद शाळा सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायतीच्या मदतीने 39 शाळा सौरऊर्जा शाळा झाल्या असून 31 जानेवारी 2018 अखेर 100 शाळा सौर शाळा करण्याचा प्रयत्न आहे.
माहिती जनसंपर्क भवन
जिल्हा विकास योजनेतून धुळ्यात पहिले माहिती व जनसंपर्क भवन साकारले जाणार आहे. या भवनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, संकल्पना रुजविण्यास मदत होणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र राज्यासाठी हा प्रयोग पथदर्शी ठरणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या भवनासाठी जागा मंजूर झाली असून त्याचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. अत्याधुनिक अशा सोयीसुविधांचा या भवनात समावेश असणार आहे.