रोकड लांबवत चोरट्यांनी रीकामे मशीन धरणाजवळ फेकले ; मुंबईच्या दिशेने चोरटे पळाल्याचा संशय
धुळे- शहरातील मालेगाव रोडवरील रामवाडी परीसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन चारचाकीतून आलेल्या पाच चोरट्यांनी लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली होती. या एटीएममध्ये सुमारे 22 लाख 28 हजारांची रोकड असल्याने चोरट्यांची दिवाळी झाली असलीतरी बँकेला मात्र बँकेला दिवाळीतच आर्थिक फटका सोसावा लागला होत. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध लागण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेण्यात आला होता तर रविवारी पहाटे चोरट्यांनी हे एटीएम मालेगाव तालुक्यातील वाकी गावाजवळील खैरी नदीजवळ फेकल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे म्हणाले की, मालेगावजवळ एटीएम फेकण्यात आल्याची माहिती मिळाली असून चोरट्यांनी त्यातील रोकड लांबवली आहे. घटनास्थळी गेल्यानंतर अधिक काही माहिती देता येईल, असे त्यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
एटीएम फेकून चोरटे मुंबईच्या दिशेने पसार
सूत्रांच्या माहितीनुसार, मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाकी गावाजवळीत नदीत पोलिसांना रविवारी पहाटे तुटलेल्या अवस्थेतील एटीएम आढळले. चोरट्यांनी एटीएममधील रोकड काढण्यासाठी संपूर्ण मशीनचे वेगवेगळे पार्टस केले शिवाय यासाठी गॅस कटरचा वापर झाला असल्याची शक्यता आहे. चोरट्यांनी मशीनमधील रोकड लांबवत मुंबईच्या दिशेने पळ काढला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मालेगाव परीसरासह चांदवड येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेशही दिले आहेत.
पोलिसांच्या गस्तीनंतर लांबवले एटीएम
वर्दळीच्या मालेगाव रोडवरील आस्था हॉस्पीटलसमोर आयसीआयसीआय तसेच एचडीएफसी बँकेचे एटीएम असून शनिवारी पहाटे 3.50 वाजेच्या पाच मिनिटे आधी पोलिसांचे गस्ती वाहन या भागातून गेल्यानंतर बोलेरा पीकअप वाहनातून आलेल्या चोरट्यांनी आधी एमटीएमबाहेरील सीसीटीव्हीच्या वायरी कापत आत प्रवेश केला. सुरुवातीला एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यात यश न आल्याने चोरट्यांनी वाहनात एटीएम मशीन टाकून लांबवले.
दहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातही फोडले होते एटीएम
गत दहा महिन्यांपूर्वी रविवार, 14 जानेवारी 2018 रोजी पहाटे चोरट्यांनी भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील गुणवंत कॉम्प्लेक्समधील अॅक्सीस बँकेच्या एटीएमला चोरट्यांनी टार्गेट करीत आधी सीसीटीव्हीची दिशा चोरट्यांनी आधी बदलली. सीसीटीव्हीच्या वायरी चोरट्यांनी कट करीत गॅस कटरद्वारे दोन चोरट्यांनी एटीएमचा खालील भाग फोडून त्यातील कॅश ट्रे अलगद बाहेर काढत एकूण तीन लाख 14 हजार 100 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. चोरट्यांनी या चारीसाठी म्युन्सीपल पार्कातील रहिवासी असलेल्या महेश एकनाथ साळी (सावरकर रोड, भुसावळ) यांच्या मालकीची व दिड लाख रुपये किंमतीची महेंद्रा मॅक्स कंपनीची चारचाकी (एम.एच.19 क्यू.6365) ची चोरी करीत वापर केला होता. यानंतर चोरटे यावल तालुक्यातील किनगावकडे गेले. तेथील टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएमबाहेरील सीसीटीव्हीच्या वायर्स कापून चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडत 75 हजारांची रोकड लांबवली. त्यानंतर चोरटे 3.43 वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील धानोरा येथे पोहोचले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बाहेरच असलेले एटीएमही चोरट्यांनी गॅस कटरने कापत त्यातील तीन लाख 63 हजार 100 रुपयांची रोकड लंपास केली होती. चोरट्यांनी भुसावळातून चोरलेल्या वाहनाद्वारे बडोद्यातही उच्छाद मांडत तेथे अनेक एटीएम फोडत रोकड लांबवली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलिस दप्तरी थंडबस्त्यात असून अद्यापही गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिस यंत्रणेला यश आलेले नाही हेदेखील तितकेच खरे!