धुळे। गेल्या महिन्याभरापूर्वी डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या धुळ्याच्या सर्वोपचार रूग्णालयातील समस्या अजून चव्हाट्यावर आल्या आहेत. सिटीस्कॅन मशीन नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याने जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने सर्वोपचार रूग्णालया अधिष्ठाता एस.एस.गुप्ता यांना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसमवेत घेराव घालण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना गुप्ता यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी शासनाकडे पाठपुरावा करून देखील यावर उपाय होत नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले. लवकरात लवकर सुविधा प्रदान न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
नातेवाईकांनी केली युवक काँग्रेस पदाधिकार्यांकडे तक्रार
गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सिटीस्कॅन मशीन बंद आहे तरी रूग्णांना तेथे बोलवून सिटीस्कॅन मशिन बंद असूनही उद्या परत या असे सांगून रोज रोज परत पाठवून दिले जाते. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून चकरा मारत असलेल्या रूग्ण आणि नातेवाईकांनी युवक काँग्रेसकडे फोनवरून तक्रार केली आणि युवक काँग्रेसची टीम तिथे धडकली. कार्यालयीन अधीक्षक डॉ.डांगे यांनी सुरवातीला कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडे कुठलेही ठोस आश्वासन नसल्यामुळे त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
शासनाकडे केली आहे मागणी
युवक काँग्रेसने आपला मोर्चा डॉ.गुप्ता यांच्या दालनाकडे वळला आणि त्यांच्या दालनातच त्यांना अनेक प्रश्नांचा भडीमार करत घेराव केला. तसेच लवकरात लवकर सिटीस्कॅन मशिन दुरूस्त करून रूग्णांना ताबडतोब रिपोर्ट दिला जावा, अशी विनंती ही यावेळी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ.एस.एस.गुप्ता यांनी मी शासनाकडे वारंवार मागणी करीत आहे मात्र शासन याबाबत उदासिन आहे. मी काय करू? असे हतबल झाल्यासारखे बोलत होते. त्यांनी त्याचे पुरावे ही युवक काँग्रेसला दाखविले. शासन आणि प्रशासन यामुळे एकमेकांकडे बोट दाखवत आहे. सदर घेराव करतेवेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश काटे, रफीक शाह, दादा कर्पे, मोहसीन तांबोळी, रिदवान अन्सारी, जावेद शाह, महेश कालेवार, योगेश विभुते, डॉ.कैलास सोनवणे तसेच रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
… त्या डॉक्टरला मारहाण सिटीस्कॅन नसल्यामुळेच!
जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने सर्वोपचार रूग्णालयातील समस्यांबाबत अधिष्ठाता एस.एस.गुप्ता यांना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसमवेत घेराव करण्यात आला. मार्च महिन्यात डॉक्टरांना झालेली अमानुष मारहाण आणि त्यामुळे संपावर गेलेले डॉक्टर्स या घटनेची सुरूवात धुळे सर्वोपचार रूग्णालयातून झाली. धुळे येथील तरूणाचा अपघात झाला. त्यामुळे त्याला डोक्याला मार लागला. अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी त्याला सिटीस्कॅनसाठी पाठवले आणि वाद विकोपाला गेला. नातेवाईकांचा तोल सुटून व डॉ.रोहन म्हासुनकर यांना जबर मारहाण झाली. या घटनेचा सारांश पाहता केवळ सिटीस्कॅनमुळे वाद वाढला असे लक्षात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.