चारचाकीतून आलेले चोरटे सीसीटीव्हीमध्ये झाले कैद
धुळे- शहरातील मामलेदार कचेरीसमोरील इलेक्ट्रीक दुकान फोडून चोरट्यांनी 25 हजारांची रोकड लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात चोरी करून पोबारा केला तर चोरट्यांची छवी सीसीटीव्हीत कैद झाली असून अज्ञात चोरट्यांचा शहर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. मामलेदार कचेरीसमोर जमनादास शीतलदास लखवानी (पद्मनाभ नगर, साक्री रोड) यांचे आनंद इलेक्ट्रीकल्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री पांढर्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप टॉमीने तोडून गल्ल्यातील 25 हजारांची रोकड लांबवली. चोरट्यांनी आपली ओळख न पटण्यासाठी तोंडाला पांढरे कापड गुंडाळले होते. दुकान मालकाचा मुलगा अमित लखवानी हा सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर त्यास चोरी झाल्याचे लक्षात आले. शहर पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक गणेश चौधरी, उपनिरीक्षक वळवी यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.