दोन गट भिडले; कारण गुलदस्त्यात
धुळे । प्रतिनिधी । शहरातील गजानन कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून दोन गट समोरासमोर आल्याने दगडफेड करण्यात आली. छेडखानी तसेच अन्य कारणावरून हा वाद उफाळल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दोन गट समोरा-समोर भिडल्याची माहिती कळाल्यानंतर बुधवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक एम. राम कुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी हिंमत जाधव तसेच धुळ्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक तसेच अग्निशमन दलाचे दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. रात्री उशिरा पोलिसांना दोन्ही गटाच्या लोकांना सरकावण्यात यश आल्याने अप्रिय घटना टळली.मात्र यात पाचकंदील भागात एक दुकान शॉर्टसर्कीटने पेटल्यामुळे धावपळ उडाली. दोन गटात झालेल्या दगडफेकीत कोण जखमी झाले याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती कळू शकली नाही. दोन गट भिडल्यानंतर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अप्रिय घटनेला आळा बसला. मात्र काही काळ या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.