धुळ्यात गणेशोत्सवात पोलिसांवर दगडफेक : गणेश मंडळाच्या 17 जणांविरुध्द गुन्हा

0

धुळे- शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर, शालिमार परमिट बिअरबार समोर गुरुवारी रात्री साक्री रोडचा राजा श्रीकृष्ण गणपती मंडळाची मिरवणूक जात असतांना गणेशोत्सावासाठी बंदोबस्तावर हजर पोलिसांवर गणेश मंडळाच्या मिरवणुकीतील युवकांनी अचानक पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती. पोलिसांनी कारवाई करीत 17 जणांविरुध्द शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल केला.

पोलिसांशी वाद घालत केली दगडफेक
धुळ्यात गुरुवारी गणरायाचे जल्लोशात आगमन झाले. शहरातील काही मंडळांच्या मिरवणूका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या. त्यापैकी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास साक्री रोडवरुन राजा श्रीकृष्ण गणपती मंडळाची मिरवणूक जात असतांना मिरवणुकीतील गोपाळ गोमसाळे याने काहीएक कारण नसतांना पोलीसांची वाद घातला. पाहता-पाहता वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. मिरवणुकीतील अनेक तरुणांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली. धावपळ सुरू झाली होती. या घटनेत गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख हेमंत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
भरत पुरनदास बैरागी, राहुल मनोहर चौधरी, अनिल भाईदास पाटील, संजय लखीचंद राठोड, हिमांशु नरेंद्र परदेशी, भटू सुभाष चौधरी, यासिन सांडू खा पठाण, कुष्णा हरी जोशी, मनोज प्रभाकर तिसे, निलेश रविंद्र जिरे, रोहित प्रभाकर सोनवणे, अमर नानासाहेब पवार, सचिन रमेश लोंढे, विशाल अजमल जाधव, प्रदीप बैरागी, परेश उपकारे, गोपाळ गोमसाळे (सर्व रा.साक्री रोड) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस कर्मचारी योगेश सुभाष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व संशयित आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.