धुळे : धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी दोघा शस्त्र तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक, 15 हजारांचा कट्टा व पाच जिवंत काडतूस जप्त केले आहे. आरीफ नवाब खान (32 रा. 90/1, इंदीरा नगर, ता. देवास, मध्यप्रदेश) व अब्दूल जावेद अब्दूल लतीफ शेख (वय 42 रा. 15/2, भोसले नगर, ता.देवास, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
मोहाडी पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक योगेश राजगुरू यांना संशयीत शहरात गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने मुंबई- आग्रा महामार्गावरील गुरूव्दाराजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवारी सायंकाळी केशरी रंगाचा ट्रक (एम.एच.18 बी.जी.7889) आल्यानंतर त्यातून दोन संशयीत उतरल्यानंतर ते वाट पाहत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता ड्रायव्हर कॅबीनच्या खाली एका पिशवीत गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले. पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक, 15 हजारांचा कट्टा व पाचशे रुपये किंमतीचे काडतूस जप्त करण्यात आले. कॉन्स्टेबल अजय दाभाडे यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयीत आरोपींविरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहा.निरीक्षक राजगुरू, एम.आय.मिर्झा, शाम काळे, अजय दाभाडे, चेतन माळी आदींच्या पथकाने केली.