धुळे । पुणे येथील दुकानाच्या शुभारंभासाठी घर मालक बाहेर गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कुमानगरात धाडसी घरफोडी केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय ठसे तज्ञांसह श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. श्वानाने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढला. मात्र हमरस्त्यावर येवून श्वानही घोटाळले. त्यामुळे तेथून चोरट्यांनी वाहनातून पलायन केल्याचे मानले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुमारनगरातील ब्लॉक नं. इ 4 रुम नं. 6 मध्ये रहाणार्या प्रमोद राधेश्याम गाबडा धुळ्यातील गरुड कॉम्प्लेक्समध्ये सिमा गारमेंट्स या नावाने दुकान आहे. नुकतेच त्यांनी पुण्यातही कपड्याचे दुकान टाकल्याने या दुकानाच्या शुभारंभासाठी प्रमोद गाबडा हे परिवारासह पुण्याला गेले होते. चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधली.
शहरातील चितोड रोडवरही घरफोडी झाली आहे. खंडेराव मंदिराजवळ असलेल्या अजय सायकलवाले यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरी करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली. मात्र घरमालक हे बाहेर गावी असल्याने ते आल्यानंतरच चोरट्यांनी नेमके काय लांबविले हे कळणार असल्याने पोलिसांनी प्राथमिक माहिती घेत घराचा परिसर सुरक्षित केला आहे. चितोड रोडवरही चोरी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातील पंधरा ते वीस हजाराच्या रोकडसह 5 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. यात कानातील झुमके, दोन ओम पान, मंगळसुत्र आदी ऐवज होता. ही घटना आज सकाळी उघडकीस येताच पोलिसांना खबर करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे एएसआय नाना आखाडे, हे.कॉ.मिलींद सोनवणे यांच्यासह ठसे तज्ञांचे पथक व श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानाने घरापासून जुन्या पश्चिम देवपुर पोलीस स्टेशनकडील रस्त्यावरुन माग काढीत डाव्या बाजूला साक्री रस्त्यापर्यंत चोरट्यांचा शोध घेतला. मात्र पुढे श्वान सरकलेच नाही. त्यामुळे तेथून चोरट्यांनी वाहनाने पोबारा केल्याचा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणी प्रमोद गाबडा यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर रितसर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.