धुळ्यात चार लाखांचा गांजा जप्त : त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात
नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची धुळ्यात सलग दुसरी मोठी कारवाई
भुसावळ : तब्बल दिड कोटी रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर धुळ्यात शनिवारी जप्त केल्यानंतर नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने याच दिवशी शनिवारी रात्री तब्बल चार लाख रुपये किंमतीच्या गांज्यासह त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आले. रात्री उशिरा तिघा संशयीतांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चार लाखांचा गांजा जप्त : त्रिकूट जाळ्यात
चाळीसगाव रोडवरील हॉटेल देश-विदेशजवळ शनिवारी रात्री काही संशयीत गांज्याची वाहतूक करणार असल्याची माहिती आयजींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. ऑटो रीक्षा (क्रमांक एम.एच.05 बीजी 4318) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात गांजा आढळल्यानंतर रीक्षातील तिघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष गांज्याची मोजणी केल्यानंतर त्याचे वजन 65 किलो भरले. चार लाख 800 रुपये किंमतीचा गांज्याची वाहतूक केल्याप्रकरणी संशयीत आरोपी मैनोद्दीन शहा सत्तार शहा (29, रा.अजमेरा नगर, धुळे), राहुल बापू कुंवर (29, रा.मोहाडी उपनगर, धुळे), बन्सीलाल रमेश गोसावी (26, रा.शिवम नर्सरीमागे, धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दोन संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम व निरीक्षक हेमंत पाटील, सहा.निरीक्षक सचिन जाधव, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाणे, बशीर पठाण, नाशिक ग्रामीणचे नितीन सपकाळे, प्रमोद मंंडलिक, सुरेश टोंगारे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक संदीप पाटील व कर्मचार्यांनी केली.
अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ
गेल्या दोन दिवसात विशेष पथकाने स्पिरीटची हेराफेरी, ब्राऊन शुगर तसेच गांज्यावर धुळे शहरासह शिरपूर तालुक्यात कारवाई केल्यानंतर अवैध धंदे चालकांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.