धुळ्यात जाळपोळ, भुसावळ, शिरपूरला दगडफेक

0

जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडत हवेत केला गोळीबार


धुळे/शिरपूर/भुसावळ: एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला खान्देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र धुळे शहरात दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ला करुन त्यांच्या दुचाकी जळण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने चाळीसगाव चौफुलीवर रास्ता रोकोचा प्रयत्न केला. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीजार्च केला असता प्रत्युत्तरादाखल जमावाने पोलिसांवर व वाहनांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांसह एसआरपीच्या जवानांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत चार राउंड फायर केले. स्थिती नियंत्रणासाठी कठोर पवित्रा घेतअश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेक, जाळपोळ, नासधूस असे प्रकार करणार्‍या जमावाने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यासमोर बंदोबस्तासाठी असलेले अधिकारी, कर्मचारी टार्गेट केले. त्यात पोलिस उपअधीक्षकासह 12 कर्मचारी जखमी झाले. धुळे जिल्ह्यातीलच शिरपुर येथे बसवर दगडफेक करण्यात आली तर भुसावळलाही दगडफेक झाल्याने तणाव निर्णाण झाला होता.

भुसावळातील दगडफेकीत पोलीस निरीक्षकांसह पाच जण जखमी

भुसावळ शहरात संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिस निरीक्षकांसह तीन कर्मचारी व एक छायाचित्रकार जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता शहरात घडली. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात बंदचा फारसा प्रभाव जाणवत नसतांना शनी मंदिर वॉर्ड भागातून मोठा जमाव बाजारपेठेत येत असल्याचे कळताच पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी धाव घेतली मात्र तो पर्यंत जमाव काझी प्लॉटपर्यंत पोहोचल्यानंतर दगडफेक केल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह डीबीतील कर्मचारी कृष्णा देशमुख, नंदकिशोर सोनवणे, संजय भदाणे हे चौघे जखमी झाले तसेच छायाचित्रकार कमलेश चौधरी यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते देखील जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी रूट मार्च करीत जमाव पांगवला. मात्र काही वेळाने पुन्हा जमाव मॉडर्न रोडवर आल्यानंतर काहींनी हॉटेल आर्य निवासवर दगड भिरकावले व या घटनेत 20 हजारांचे नुकसान झाले.

भारत बंद आंदोलनादरम्यान धुळे शहरात सकाळी शांततेचे वातावरण असतांना दुपारी एकनंतर धुळे शहरातील चाळीसगाव व मालेगाव रोडला जोडणार्‍या नवीन शंभर फुटी रस्त्यावर जमाव जमू लागला. या रस्त्यावर चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आहे. या परिसरातील काही भंगारातील वाहने आणि मोटारसायकली जमावाने जाळल्या. चार वाहनांवर दगडफेक केली. टपर्‍यांची नासधूस केली. ठिकठिकाणी मुरूमांचे डंपर महामार्गावर ओतून टायरची मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत वाहतूक ठप्प केली होती. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. एसआरपीच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. असे असताना जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. दगडफेकीत पोलिस उपअधीक्षक हिरे, पोलिस निरीक्षक प्रकाश मुंडे यांच्यासह 12 कर्मचारी जखमी झाले. जमावाने चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात कर्तव्यावर असलेल्या रिंकेश वळवी, दिनेश जाधव व प्रशांत पाटील या कर्मचार्‍यांवर प्राणघातक हल्ला चढविला. मात्र, या हल्ल्यातून कर्मचारी बालंबाल बचावले. जमावाने त्यांच्या एमएच18/एडी2885 व एमएच19/5659 या दोन दुचाकी आगीच्या हवाली केल्या. परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान केले. व्हिडीओ शुटींगच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेणे आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे. शंभर फुटी रस्त्यावर दगडांचा खच झाल्याने स्वच्छतेसाठी महापालिकेचे सहकार्य पोलिसांनी घेतले. या संवेदनशील भागात अधिकचा बंदोबस्त असून एसआरपीच्या तुकड्याही वाढविल्या आल्या आहेत.

शिरपूरला दगडफेकीत दोन प्रवासी जखमी

शिरपूर शहरातील मांडळ चौफुलीवर सकाळी जमाव फिरून बंदचे आवाहन करीत होता. त्याचवेळी शिरपूर आगाराची शिरपूर-पानसेमल बस तेथून जात होती. जमावाला पाहून चालक अर्जुन बोरसे यांनी बस थांबवून बाजूला घेतली. मात्र जमावातील काहींनी बसची केबिन व प्रवासी आसनांच्या बाजूला दगडफेक केली. या घटनेत बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमंत काशीनाथ चितोडकर (48, रा.धुळे) व सागर अर्जुन पावरा (रा.वकवाड ता.शिरपूर) जखमी झाले. वाहक डी.ए.कोळी यांनी उभयतांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल
केले.