धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

धुळे – साक्री नगरपंचायतीने बेकायदेशीरपणे व्यापारी गाळे तोडल्याचा आरोप करत न्याय मिळावा, या मागणीसाठी 15 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधूबाई साळुंखे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गेल्याच महिन्यात सिंधूबाई साळुंखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हरतालिकेची पूजा केली होती. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. यापूर्वीही त्यांनी दोनदा उपोषण केले होते. मात्र आश्वासन देऊनही न्याय मिळत नसल्याची तक्रार करीत त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते. मात्र हा विषय साक्री नगरपंचायतीचा असल्याने जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही.