धुळे : कबीरगंज भागातील रस्ता कामासाठी आणलेले सुमारे 74 हजार रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडील चोरी केलेले साहित्य जप्त केले आहे. शब्बीर शाह सुलेमान शहा (32, रा.कबीर गंज, पाण्याच्या टाकीजवळ, धुळे), जावेद शेख सलीम (रा.सत्तारच्या वाड्याच्या मागे, धुळे) व शाहरूख राजू पठाण (21, रा.कबीरगंज, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून अटक
ठेकेदार अश्विन भावराव माळी (21, संत तुकाराम नगर, शिरपूर) यांनी 20 रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कबीरगंज रस्ता कामासाठी आणलेले 13 लोखंडी चॅनल व जनरेटर डायनामा मिळून 74 हजारांचा मुद्देमाल 18 ते 19 ऑगस्टदरम्यान चोरीला गेला होता. तिघा आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या साहित्यासह दुचाकी मिळून एक लाख 35 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक योगेश टीकले, हवालदार के. एन.वाघ, नाईक बी.आय.पाटील, नाईक एस.जी.कढरे, नाईक अविनाश पाटील, कॉन्स्टेबल हेमंत पवार, कॉन्स्टेबल स्वप्नील सोनवणे, कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, कॉन्स्टेबल मुकेश पावरा आदींच्या पथकाने केली.