धुळ्यात तब्बल दिड कोटींची ब्राऊन शुगर जप्त : भुसावळातील आरोपी जाळ्यात
आयजींच्या विशेष पथकाची धडक कामगिरी : आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे
भुसावळ : देशातील बॉलीवूड सेलिब्रेटी ड्रग्ज प्रकरणात पकडले जात असतानाच धुळ्यातही विशेष पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीचे तबल अर्धा किलो ब्राऊन शुगर जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भुसावळ येथील 43 वर्षीय संशयीत सैय्यद शेरू सैय्यद बुडन (43, पंचशील नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत धुळ्यातील मोहाडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जप्त ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दिड कोटींहून अधिक किंमत असल्याचे सांगण्यात आले.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
धुळे शहरातील हॉटेल रेसीडेन्सी पार्कजवळ एक संशयीत नशेसाठी वापरल्या जाणार्या प्रतिबंधीत ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक आयजींच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाने स्थानिक मोहाडी पोलिसांच्या मदतीने शनिवार, 9 रोजी सायंकाळी सापळा रचला. संशयीत सैय्यद शेरू सैय्यद बुडन (43, पंचशील नगर, भुसावळ) हा हॉटेल परीसरात येताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीताची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ब्राऊन शुगर आढळली. पोलीस ठाण्यात संशयीताला आणल्यानंतर रात्री उशिरा अधिकार्यांच्या उपस्थितीत ब्राऊन शुगरची मोजणी केल्यानंतर तिचे वजन 500 ग्रॅम आढळले. सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त केल्याप्रकरणी आरोपी बुडन विरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जप्त किंमतीची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दिड कोटींपेक्षा अधिक किंमत असल्याचे सांगण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक परीक्षेत्रातील महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आय.जी.पथकातील पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, कॉन्स्टेबल फिरोज पठाण, कॉन्स्टेबल नितीन सपकाळे व मोहाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम.आय.मिर्झा, राजेंद्र मराठे, संदीप थोरात, प्रभाकर ब्राह्मणे, प्रवीण पाटील, राहुल गुंजाळ, जितेंद्र वाघ आदींच्या पथकाने केली.