धुळ्यात तीन बनावट पिस्तुलांसह परप्रांतीय आरोपी जाळ्यात

0

अपर अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकाची कारवाई ; सहा जीवंत काडतूस जप्त

धुळे – शहरातील लळींग टोलनाक्याजवळ काही जण बनावट पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाल्यावरून पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात मध्यप्रदेशातील सेंधवा येथील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून तीन बनावट पिस्तुलासह सहा जीवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची कारवाई मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपीवरूध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता
लळींग टोलनाका परीसरात मंगळवारी रात्री एका हॉटेलजवळ संशयीत राजू सुरसिंग पवार (40, रा.घेगाव, ता.सेंधवा, जि.बडवानी, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून तीन बनावटी पांढर्‍या रंगाचे पिस्टल, सहा जीवंत काडतूस जप्त करण्यात आली. त्याची एकूण किंमत 90 हजार 720 रुपये आहे. मोहाडी पोलिसात दाखल एका गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी संशयीत शस्त्र विक्रीसाठी धुळ्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीच्या अटकेनंतर शस्त्र विक्रीतील रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

 यांच्या पथकाने केली कारवाई
अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र शोध पथकातील स्वप्निल राजपूत, मोहम्मद मोबीन, रफिक पठाण, राहुल सानप, कबीर शेख, आरीफ पठाण, बिपीन पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, प्रभाकर ब्राह्मणे, राजेंद्र मराठे, जितेंद्र वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.