अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकाची कामगिरी ; बनावट पिस्तुलासह पाच लाखांचा मुद्देमाल जाळ्यात
धुळे- शहरात दरोड्याच्या उद्देशाने टोळी आल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाल्यानंतर लावलेल्या सापळ्यात चौघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून बनावट पिस्तुल, दरोड्याचे साहित्य, कार, सोन्या-चांदीचे दागिने मिळून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींमध्ये धुळ्याच्या एका चालकासह उत्तर प्रदेशातील तिघा आरोपींचा समावेश आहे. आरोपींच्या अटकेतील अनेक दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पानसरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केली.
या आरोपींच्या आवळल्या मुसक्या
अजय प्रताप कटवाल (24, पुरूषोत्तम कॉलनी, हॉटेल रसराज मागे, नवाव बारीजवळ, देवपूर, धुळे), वाहन चालक ब्रिजेशकुमार जगतपाल गुप्ता (22, हिरागंज, पो.जगापूर, ता.कुंडा, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश), जयप्रकाश राजाराम यादव (28, दिनदासपूर, पो.वोदार, ता.पिंडरा, वाराणसी, उत्तरप्रदेश), जुल्फकार हस्मतअली इद्रीसी (23, हतगवा, ता.कुंडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश) या आरोपींना अवधान एमआयडीसीमधील महाराष्ट्र एक्सट्रक्शन ऑईल मिलजवळून बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 21 हजार 875 रुपयांची रोकड, 27 हजार 500 रुपये किंमतीचे मोबाईल, एक लाख चार हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, 30 हजार रुपये किंमतीची बनावट पिस्तुल, तीन लाख रुपये किंमतीचे रेडियम स्टीकर, लोखंडी टॉमी, विना क्रमांकांची सॅण्ट्रो कार मिळून चार लाख 83 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अभिषेक पाटील, राजू मराठे, जाधव, देशमुख आदींच्या पथकाने आरोपींच्या अवधानी एमआयडीसी परीसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मोहाडी पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.