धुळ्यात दिव्यांग भगिनीचा थाटात पार पडला विवाह

चाळीसगावातील वर्धमान धाडीवाल मित्र परीवाराने केले सहकार्य

चाळीसगाव : शहरातील स्वयंदीप संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी निकम यांच्या संकल्पनेतून आणि वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परीवाराच्या योगदानाने आखतवाडे, ता.पाचोरा येथील बाबूलाल लोटन परदेशी यांची दिव्यांग कन्या लोचना (सरला) व आखतवाडे, ता.सटाणा येथील कै. सुरेश त्र्यंबक खैरनार यांचे चिरंजीव भुषण यांचा विवाह नुकताच धुळे रोड येथील बालाजी लॉन्समध्ये मोठ्या थाटात झाला.

धाडीवाल यांनी केली वचनपूर्ती
दिव्यांग बंधू आणि भगिनी साठी सदैव मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच दिव्यांग भगिनी सरला हिचा विवाह मोठ्या थाटात लावून देण्याचे निश्चित केले होते त्याच बरोबर दिव्यांग भगिनी आणि बंधू यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा देखील संकल्प केला होता त्याचाच एक भाग म्हणून रविवार, 27 मार्च रोजी सरला व भुषण यांचा विवाह मोठ्या थाटात झाला. या विवाहाची संकल्पना स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम यांनी मांडली होती. अनोख्या पद्धतीने मोठ्या थाटात साजरा झालेल्या या विवाहप्रसंगी चाळीसगाव तालुक्यातीलच नव्हे तर राज्यभरातून अनेक मान्यवर मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी या विवाह समारंभास हजेरी लावून तोंडभरून कौतुक केले.

थाटात विवाह ही तर गौरवास्पद बाब : मीनाक्षी निकम
मीनाक्षी निकम म्हणाल्या की, एखाद्या दिव्यांग भगिनी चा असा विवाह होणे ही जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर देशातील पहिली घटना असेल इतका थाटामाटात अशा पद्धतीचा विवाह एखाद्या सामाजिक जाणिवेतून सामाजिक कार्यकर्त्या मार्फत होणेही ही गौरवाची बाब आहे. अशा प्रकारचे लोक समाजामध्ये पुढे आल्यास समाजातील अनेक दिव्यांग भगिनी आणि बांधव यांना आधार मिळून त्यांचे जगणे सुकर होईल. वर्धमान धाडीवाल मित्र परिवाराने जरी हा विवाह आयोजित केला असला तरी या प्रसंगी कन्यादान हे पुणे येथील वर्धमान धाडीवाल यांचे व्याही-व्याहीण कर्णावट परीवारातर्फे करण्यात आले. हा संपूर्ण समारंभ यशस्वी होण्यासाठी वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परीवाराने परीश्रम घेतले.