धुळ्यात दोन तृतीयपंथीयांमध्ये वाद

0

धुळे । शहरातील दोन धर्मिय तृतिय पंथीयात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु असून या वादातून आता हाणामारीचे प्रकारही घडू लागले आहे. गेल्या 25 ऑगस्ट रोजी शहरातील फुलवाला चौकात असाच हाणामारीचा प्रकार घडला असून हिंदू धर्मिय तृतीय पंथीयांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. धर्मांतरासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात येत असून धर्मांतर केले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी दिली जात आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने वेळीच दोषींवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकार डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. न्याय देण्यात यावा अन्यथा तीव्र आदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शनेही करण्यात आली.

15 ते 20 जणांची टोळी
देवपूर भांडपुरा मुस्लिम भागात त्यांचे वास्तव्य आहे. पद्मा नायक, सिमा असलम, खल्लो हाजी यांच्यासह 15 ते 20 जणांचा त्यांचा संघ आहे. हे तृतीय पंथीय गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्हाला त्रास देत असून मुस्लिम धर्म स्विकारा म्हणून आमचेवर दबाव टाकीत आहेत. गेल्या तीन- चार महिन्यांपासून त्यांचा त्रास अधिकच वाढला आहे. आधी गावात समोरासमोर आल्यास त्रास देणारे हे मुस्लिम तृतीय पंथीय अलीकडे मालेगाव रोड येथील यल्लम्मा देवी मंदीरात येवून त्रास देवू लागले आहेत.

पोलीसात गुन्हा
या संदर्भात आझादनगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तत्काळ संबंधीतांवर कारवाई करावी. सध्या शहरात गणेशोत्सव सुरु असून केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून आम्ही संयम बाळगला आहे. वेळीच हा त्रास थांबला नाही तर भविष्यात अनर्थ घडण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे.

दोन धर्मीय वाद
यल्लम्मादेवी मंदीरातील हिंदू तृतीयपंथी पार्वती परशूराम जोगी यांनी तक्रार केली असून त्यांनी उजैन, इंदोर येथील पिठाधिश्‍वर किन्नर आखाडाचे सदस्य असून हिंदू तृतीयपंथीय म्हणून मालेगाव रोडवरील यल्लमादेवी मंदीरात वास्तव्याला असल्याचे सांगितले आहे. यल्लम्मादेवीचे पुजारी म्हणून आमचा पूर्वापार मान असून सातवी पिढी कार्यरत आहे. हिंदू धर्मीय तृतीयपंथी म्हणून आम्ही हिंदूंचे सर्व सण-उत्सव साजरी करीत असतो. मात्र शहरात मुस्लिम धर्मातील तृतीय पंथीय असून ते आमच्यावर धर्मांतरा करण्याचा आग्रह करता असे निवेदनात म्हटले आहे.

शिवीगाळचा प्रकार
मुस्लिम धर्म न स्विकारल्यास तुम्हाला जोगवा मागता येणार नाही, तुम्हाला जागेवरच ठार मारू अशा धमक्या ते देत आहेत. हिंदू असल्यामुळे आम्ही कपाळाला टिकली (कुंकू) लावतो. याला देखील या मुस्लिम तृतीय पंथीय मनाई करत असून गेल्या 25 रोजी जोगवा मागीत असतांना या तृतीय पंथीय मुस्लिमांनी तेथे येवून अश्‍लिल शिवीगाळ केली. कपाळावरची टिकली काढा, मुस्लिम धर्म स्विकारा मगच जोगवा मागा. असा त्यांचा आग्रह केला. नकार दिल्याने त्यांनी आमच्या जवळील देवीचा चौरंग फेकून दिला.