धुळ्यात धूम स्टाईल मोबाईल चोरणारी गँग पोलिसांच्या जाळ्यात

0

गुप्त माहितीवरून कारवाई : 17 मोबाईलसह दुचाकी जप्त

धुळे : चालत्या गाडीवरुन मोबाईल हिसकावून पळून जाणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना धुळे शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या पथकाने पकडले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी 17 चोरीचे मोबाईल, 1 दुचाकी काढून दिली़ एकूण 1 लाख 28 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल दोघांकडून जप्त करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे म्हणाले. पायी मोबाईलवर बोलत असताना मोटारसायकलस्वारांनी मागावून येऊन मोबाईल हिसकावून पोबारा केला होता़ ही घटना रविवारी शहर हद्दीत घडली होती़

यांना आरोपींना अटक
मोबाईल चोरटे हे चितोड रोड भागातील श्रीराम नगरात राहत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली़ तसेच साक्री रोड भागात ते गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच सापळा लावण्यात आला आणि खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (रा़ दंडेवालेबाबा नगर, मोहाडी, धुळे) आणि शंकर बालकिसन रेड्डी (रा़ रेल्वे स्टेशन रोड, साईबाबा चौक, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली़ त्यांच्या चौकशीतून 17 मोबाईल आणि 1 दुचाकी असा एकूण 1 लाख 28 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़