धुळ्यात नो व्हेईकल डे साजरा

0

धुळे । जागतिक स्तरावर प्रदूषणाची वाढलेली भयानकता त्यामुळे या भयावह परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सारेच एकवटले आहेत त्याचा एक भाग म्हणून धुळेकर न्यायाधीश, वकील सरसावले आणि गेली दोन वर्ष पर्यावरण जागृतीसाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे प्रयत्नाचे नागरिकांकडूनही स्वागत झाले आहे. ’घाला प्रदूषणास आळा- मोटार वाहनाचा वापर टाळा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने शहरात जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश आणि वकिलांनी पेट्रोल, डिझेल वाहनांना टाटा करीत सायकलने न्यायालय गाठले.

सायकलींवर घोषवाक्यांचे फलक
शिवतीर्थ चौकात शनिवारी जमा होत सर्व न्यायाधीश आणि वकील फाशीपूल मार्गे जिल्हा न्यायालयाकडे मार्गस्थ झाले होते. यावेळी सर्वांच्या सायकलींवर जनजागृतीपर घोषवाक्यांचे फलक लावण्यात आले होते. या विशेष मोहिमेचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणारचे सचिव जे. ए. शेख यांनी केले. या मोहिमेत मुख्य न्यायाधीश पी.सी. बावस्कर,न्यायमूर्ती पी.एल.गजभिये, अ‍ॅड. मधुकर भिसे,सुरेश बागुल,न्यायाधीश सचिन निहारकर, जे.ए.पाटील, प्रबंधक क्षीरे आदी सहभागी झाले होते. गेल्या वर्षींही वकिलांकडून सायकलवरून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.अश्या जनजागृतीच्या माध्यमातून न्यायाधीश, वकील यांनी उचलेले हे पाऊल धुळे वासियांनी उस्फुर्त स्वागत करत आपलेसे करण्याचा मानस केला आहे.

‘मोटर वाहन टाळा – घाला प्रदुषणास आळा’
याकरिता शनिवारी शहरातील शिवतीर्थापासून हा सायकल प्रवास सुरू केला होता. पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. एका दिवसासाठी का असेना वाहनांचा वापर टाळून पर्यावरणपूरक जीवन सर्वांनी जगावे या उद्देशाने ’घाला प्रदूषणास आळा मोटार वाहन टाळा’ या थीमवर शनिवारी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचार्‍यांनी सायकलचा वापर करण्याचा निर्धार केला होता.त्यानुसार न्यायाधीशांनी निवासस्थानापासूनच सायकलने न्यायालय गाठले होते.