धुळ्यात पकडलेली ती रक्कम मुंबईतील सराफाची ; ती रक्कम हवाल्याची नसल्याचा खुलासा

0

धुळे- इंदौरहून मुंबईकडे हवालामार्गे रोकड नेली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गोपनीय कारवाईत 23 लाख 50 हजारांची रोकड मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात सोमवारी पहाटे जप्त करण्यात आली होती तर पोलिसांनी या प्रकरणी आयकर विभागाशीही पत्र व्यवहार केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ही रक्कम मुंबईतील सराफा व्यावसायीक लालूभाई मजेठिया यांची असल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी बुधवारी एलसीबी निरीक्षकांची भेट घेत ती रक्कम हवाल्याचा नसल्याचा खुलासा केला.

गोपनीय माहितीनंतर पोलिसांची कारवाई
इंदौरहून हवालामार्गे चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रोकड नेली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर सोनगीर तसेच अवधान फाटा येथे सापळा रचण्यात आला. महामार्गावरून जाणार्‍या वाहनांची तपासणी सुरू असताना भरधाव वेगात मुंबईकडे जाणारी मारूती सियाज चारचाकी (एम.पी. 09 सी.आर 6099) अडवण्यात आल्यानंतर तिची बारकाईने तपासणी केल्यानंतर मागच्या सीटच्या मधोमध बनवण्यात आलेल्या गुप्त कप्प्यात 23 लाख 50 हजारांची रोकड आढळली होती. या प्रकरणी चौकशीसाठी मुकेशभाई गोविंदभाई पटेल (36, रा.1320, सी विंग, सीपी टँक सर्कल, भोलेश्वर, मुंबई) तसेच सहदेव जयवंत सुर्वे (30, इंद्रजीत यादव चाल, गणेश नगर, पम्प हाउस, अंधेरी पूर्व) यांना ताब्यात घेण्यात आले होते. बुधवारी व्यापारी सराफा व्यावसायीक लालूभाई यांनी निरीक्षक हेमंत पाटील यांची भेट घेत ही रक्कम आपली असल्याचे सांगत या रकमेचा हवाला प्रकरणाशी संबंध नसल्याचे लेखी दिले. दरम्यान, जप्त रक्कम सरकारजमा असून न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर ही रक्कम व्यापार्‍यास मिळणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.