कार्यकर्त्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ आमदार अनिल गोटेंचा देवपूर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या
धुळे- महापालिका निवडणुकीच्या उंबरठ्यावर धुळ्यात राजकीय वातावरण तापले असून चारचाकीत मतदारांना वाटपासाठी पैसे असल्याच्या संशयातून लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पदाधिकार्याच्या वाहनात दगड टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता जयहिंद माविद्यालयाजवळ घडली. या प्रकारानंतर तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली तर पोलिसांनी लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे कळताच आमदार अनिल गोटे यांनी धाव घेत पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवत देवपूर पोलिस ठाण्याबाहेर सुमारे दोन तास ठिय्या मांडला. पोलिस प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत तक्रारदाराची समजूत काढल्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल न करण्याचा पवित्रा घेतल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
पैसे वाटपाच्या संशयातून वाहनाच्या फोडल्या काचा
जयहिंद महाविद्यालयाजवळून भाजपाचे तालुका युवा अध्यक्ष गोविंद शिरोळे हे चारचाकी फॉर्च्युनर (एम.एच.19 सी.एफ. 1616) ने जात असताना लोकसंग्रामचे कार्यकर्ते अनिल साळुंखे व ईतरांना त्यात पैसे असल्याचा संशय आला. त्यांनी वाहन अडवत त्यात मोठे दगड टाकून वाहनाच्या काचा फोडल्या. या प्रकारानंतर शिरोळे देवपूर पोलिस ठाण्यात धाव घेत साळुंखेसह इतरविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी उभयंतांना ताब्यात घेतले. ही वार्ता कानी पडताच आमदार गोटे कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात धडकले. पोलिस प्रशासन सत्ताधार्यांच्या इशार्यावर नाचत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगत पोलिस प्रशासनाच्या कारभाराचे शेलक्या शब्दात वाभाडे काढले. कार्यकर्त्यांना हात लावल्यास पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा देत प्रत्यक्षात त्यांनी ठिय्या मांडून आंदोलन सुरू केल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. डीवायएसपी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी समजूत काढूनही उपयोग झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणुकीतील उमेदवार कैलास चौधरी व सागर कांबळे यांनी अण्णांच्या भूमिकेला समर्थन देत ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला.
पोलिस प्रशासन मंत्र्यांच्या दबावाखाली -आमदार
ठिय्या आंदोलनानंतर आमदार गोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सांगितले की, शहरात सर्रास पैशांचे वाटप सुरू असून पोलिस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. ते आमचे काम नाही, निवडणूक आयोगाचे असून त्यासाठी भरारी पथक नेमले जात असल्याचे उत्तर दिले जाते तर दुसरीकडे माझे कार्यकर्ते पैसे वाटप करणार्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर मात्र खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आपण पोलिस प्रशासनाला अजिबात भीत नाही, असे सांगून ते म्हणाले की, शहरात जेथे कुठे पैसे वाटले जात असतील तेथील नागरीकांनी रात्री-बेरात्री केव्हाही आपल्याला दूरध्वनी करावा, आपण लागलीच तेथे हजर राहू, असेही ते म्हणाले.