धुळे । बसस्थानकातून बाहेर पडणार्या बससमोर अचानक एक व्यक्ती आल्याने चालकाला प्रसंगावधान राखत बे्रक लावावा लागला. जर बे्रक लागला नसता तर एवढेच विचारण्याचे निमित्त होऊन बसचालकाला बसखाली उतरवून बेदम मारहाण झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. बसचालक कामगार सेनेचा सचिव असल्याने तसेच वाहक संघटनेचा पदाधिकारी असल्याने अन्य बसचालकांनी चक्का जाम आंदोलन छेडून या घटनेचा निषेध केला. परिणामी बसस्थानक आवारासह रस्त्यावर बसेस उभ्या राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली. एस.टी. महामंडळाच्या अधिकार्यांसह पोलिसांना खबर मिळताच त्यांनी बसस्थानकात येवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तर पोलिसांनी मारहाण करणार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. तरीही तब्बल तासभर वाहतुक खोळंबून राहिल्याने प्रवशांसह शालेय विद्यार्थी व नागरिकांना या वाहतुक कोंडीचा फटका बसला.
पोलीसांचे कारवाईचे आश्वासन : दरम्यान या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे, उपनिरीक्षक बर्गे, महेश जाधव यांनी घटनास्थळी येवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणार्यांवर कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमीका बस चालक-वाहकांनी घेतली. तर आधी आंदोलन मागे घ्या मारहाण करणार्यांवर कारवाई निश्चित होईल असे म्हणत पोलिसांनी बस चालक-वाहकांची समजूत काढली.
समज दिल्याचा आला राग
धुळे आगारातील कामगार सेनेचे सचिव असलेले बसचालक राजेश दिलीप कोकरे हे आपल्या नियोजित ड्युटीनुसार धुळे-जापी-शिरढाणे (एमएच20-डी9483) ही सकाळी सात वाजता सुटणारी बस घेवून धुळे बसस्थानकातून बाहेर निघत असतांना टॅक्सी स्टँडच्या वळणावर अचानक समोरून अजय वाघ हा तरूण बससमोर आला. प्रसंगावधान राखत चालक राजेश कोकरे यांनी ब्रेक दाबून बस नियंत्रीत केली. तसेच समोरून येणार्या तरूणाला उद्देशून ’का रे भाऊ ब्रेक लागला नसता तर तुझा जीव गेला असता’ असे म्हटले. नेमके याचाच राग येवून वाघ याने बसवर चढत चालक राजेश कोकरे यांना बसखाली खेचून मारहाण करण्यास सुरूवात केली. या बसचे वाहक वाल्मिक पवार हे देखील बहुजन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असल्याने क्षणात ही बातमी स्थानकात पोहोचली.
तरूणाने केला पोबारा
एस.टी. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्याला मारहाण झाल्याने संघटनेच्या सदस्यांसह अन्य बसचालक वाहकांनी यावेळी आंदोलनाची भूमीका घेतली. परिणामी, बसस्थानकातील बसेससह स्थानकानजीकच्या रस्त्यावर असलेल्या बसेसही आहे तेथेच थांबल्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वातावरण तापले. सकाळची वेळ असल्याने बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. तर बसस्थानकाच्या बाहेर रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची वर्दळ असल्याने गोंधळात अधिकच भर पडली. या संधीचा फायदा घेत मारहाण करणारा युवक अजय वाघ हा रिक्षात बसून तेथून निघून गेला.