धुळ्यात भाजीपाल्याच्या दरात वाढ

0

धुळे । शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा देशव्यापी संप पुकारला आहे. देशभरातील 22 राज्यात हे आंदोलन सुरू असून महाराष्ट्रातही नाशिक, नगर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी संपकरी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. धुळे जिल्ह्यात मात्र प्रभावी असलेल्या शेतकरी संघटनेने या संपात सहभाग नसल्याचे म्हणत अंग काढून घेतले आहे. तरीही या शेतकरी संपाची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसली आहे. शनिवारी भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ याची साक्ष देत आहेत. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह वाढीव 50 टक्के हमीभाव, दूधाचे दर या प्रमुख मागण्यांसाठी हा देशव्यापी दहा दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.

किंमतीत दीडपट वाढ
शनिवारी भाजीपाला बाजारात रोजच्या किंमतीत दीडपट वाढ झाल्याचे दिसून आले. अगदी परवापर्यंत 20 रूपये किलो दराने मिळणारे बटाटे शनिवारी 30 रूपये किलोने विक्री होत होते. तर हिरवा भाजीपाला एरवी 10 रूपये जुडी दराने उपलब्ध होत होता. तो शनिवारी किलोच्या भावाने विकला जात असल्याने सरासरी 40 ते 60 रूपये किलो हिरवी पालेभाजी उपलब्ध होती. कोथंबीर तर 100 हून अधिक रूपये किलोचा भाव पार करून गेली होती. शेतकर्‍यांचा हा संप पूर्वघोषित कार्यक्रमानूसार दहा दिवस चालणार आहे. संपाच्या दुसर्‍याच दिवशी जर धुळे शहरात भाजीपाल्याचे दर दीडपटीने वाढणार असतील तर संप काळात हिरवा भाजीपाला आणि कांदे-बटाट्यांसारखे कंदही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुदैवाने दूधाच्या भावात अजून तरी कुठली छुपी वाढ झालेली नाही. मात्र संपाचे कारण देत भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडणार आहे.

मागील वर्षीही पुकारला होता संप
गेल्या वर्षी याच मागण्यांसाठी राज्यातील शेतकर्‍यांनी संप पुकारला होता. त्यावेळी शासनकर्त्यांनी दिलेले आश्‍वासन वर्षभरानंतरही पूर्ण झाले नसल्याने सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली. अशी धारणा शेतकर्‍यांची झाली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचने या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्याचे पडसाद हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी ठिकाणी काल उमटले. शेतकर्‍यांनी भाजीपाल्यासह दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला. धुळे जिल्ह्यात मात्र शेतकरी संघटनेने या संपात सहभाग नसल्याचे दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.