धुळ्यात मंडप व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

0
धुळे : शहरातील मोगलाईत राहणाऱ्या मंडप व्यावसायिक तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना  गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  मोगलाई येथील  देशमुख वाडा आहे. या वाड्यात श्रीकांत सुर्यवंशी (अंदाजे वय ३५) हे आपल्या परिवारासोबत राहतात त्यांना पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी आहे़ त्यांचा स्वत:चा मंडप व्यवसाय आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी दैनंदिन कामही केले़ गुरुवारी मात्र ते गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले. त्यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.
यावेळी त्यांची पत्नी कुठे होती? गळफास घेतला तेव्हा कोणाला समजले का नाही? रात्री त्यांनी केव्हा गळफास घेतला असावा, अशा विविध प्रश्नांची उत्तरे अद्यापही अनुत्तरीत आहेत़ घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ घटनेचा पुढील तपास सुरु आहे.