धुळ्यात राष्ट्रवादीचे श्राद्ध आंदोलन

0

धुळे । पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या भडक्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणार्‍या मोदी सरकारचे आज धुळ्यात श्राध्द घातले. सर्वपित्रीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारचे श्राध्द घालुन निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. राष्ट्रवादीच्या या आंदोलनाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना पेट्रोल, डिझेलच्या दरात 2-4 रुपयांनी वाढ केली तरी भाजपवाले गळाफाटेपर्यंत ओरडायचे त्यांचा आवाज आता बंद का? असा सवाल राष्ट्रवादीने विचारला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र मतदान करणार्‍या जनतेवर आता पश्‍चातापाची वेळ आली आहे. महात्मा गांधींना अभिवादन करुन गांधी पुतळ्यापासून लोटगाड्यांवर दुचाकी ठेवून निषेध मोर्चा काढला.

घोषणांनी दणाणला आग्रारोड
‘देश की जनता करे पुकार, नही चाहीये मोदी-फडणवीस सरकार’, ‘पेट्रोल डिझेल दरवाढ करणार्‍या मोदी-फडणवीस सरकारचा धिक्कार असो’, अशा विविध घोषणा देत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आग्रारोड दणाणून सोडला होता. आग्रारोड मार्गावरुन मनपाकडून राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11.00 वाजता येवून धडकला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कलेक्टर ऑफिस समोरच मंडप टाकुन विधीवत भटजीच्या हस्ते मोदी सरकारचे श्राध्दच घातले.

भाव कमी करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा
सर्वसामान्यांची कंबरडे मोडणारी पेट्रोल डिझेल दरवाढ करुन सरकारचे नेमके काय साधले आहे, युपीएचे काळात कच्च्या तेलाचे भाव 110 प्रति डॅालर होते, तरीही पेट्रोलचा दर 60-70 रुपयांदरम्यान होता. आता तर कच्या तेलाचे दर 30 ते 40 डॉलरवर पोहचले आहे. असे असतांनाही पेट्रोल 30 रुपये लिटर मिळण्याऐवजी 80 रुपयाने मिळत आहे. एक ते दोन महिन्यात पेट्रोल 16 रुपयांनी तर डिझेल 4 रुपये लिटरमागे वाढविण्यात आले आहे. एका सिलेंडरमागे 75 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महामागाईचा आलेख वाढला आहे. त्यामुळेच सरकारने पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे.

आंदोलनात यांचा सहभाग
या आंदोलनात माजी आ.राजवर्धन कदमबांडे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, उपमहापौर अन्सारी उमेर शव्वाल, मोहन नवले, दादा खताळ, भानुदास पारोळेकर, नंदलाल अजळकर, वाल्मीक जाधव, गणेश जाधव, दिलीप भामरे, शिवाजीराव पवार, किशोर चौधरी, नंदू येलमामे, कुणाल पवार, रविंद्र आघाव, संदीप पाकळे, संदीप पाटोळे, गिरीश भामरे, रणजीतराजे भोसले, साहेबराव देसाई, अ‍ॅड. रवींद्र पाटील, शेख इम्रान, सलीम शेख, कुंदन पवार, आर. बी. माळी, मुन्ना शितोळे, चंद्रकांत महाजन, महेंद्र शिरसाठ, मयूर कोळी, दिनेश पोतदार, संदीप हजारे, ज्योती पावरा, राधीका ठाकरे, चंद्रकला जाधव, चंद्रकला शिंदे, कल्पना बोरसे.