धुळ्यात रेमडेसीवरची चढ्या दराने विक्री : तिघे जाळ्यात

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कारवाई : रॅकेट कार्यरत असल्याची शंका

धुळे : कोरोनाच्या कठीण काळात बाजारातील परीस्थितीचा फायदा घेत चढ्या दराने रेमडेसीवरची इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेने तीन संशयीतांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून रेमडेसीवर इंजेक्शनसह रोकड व मोबाईल मिळून 38 हजार 8899 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी करण्यात आलेल्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. आरोपींचे रॅकेट कार्यरत असल्याची शंका असून पोलिसांना त्याचा बीमोड करण्याची अपेक्षा आहे. सुरूवातीला कृष्णा भिकन पाटील (22, रा. प्लॉट नंबर 61, फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी) या तरुणाला बनावट ग्राहक पाठवून अटक करण्यात आली. आरोपीने तब्बल एका इंजेक्शनची 16 हजारात विक्री चालवली होती तर या प्रकरणी त्यास मदत करणार्‍या सागर विलास भदाणे (26, रा. प्लॉट नंबर 87, फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी) व चितेश कैलास भामरे (22, रा. यशवंत नगर, साक्री रोड, धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या चौकशीतून आणखी काही साठा सापडण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस धीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक उमेश बोरसे, पोलिस उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोलिस कर्मचारी संदीप थोरात, प्रकाश सोनार, योेगेश जगताप, श्रीशैल जाधव, संजय सुरसे, कैलास महाजन, मनोज पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन शेवतकर आदींच्य पथकाने केली. कारवाईप्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश देशपांडे यांची उपस्थिती होती.