धुळे । भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे डॉक्टर रोहन मामुणकर यांना सर्वोपचार रुग्णालयाच्या अपघात विभागात मारहाण केल्याप्रकरणातील संशयित प्रदीप वेताळ याच्या ’लॉकअप’मधील आत्महत्या प्रकरणाचा तपास ’सीआयडी’ने लगेचच सुरु केला. या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांसह नेमणुकीस असलेल्या पोलिसांवर कारवाईची कुर्हाड पडण्याची शक्यता व्यक्त होते आहे. अपघातातील जखमीचा मृत्यू, डॉक्टरची गंभीर दुखापत आणि या प्रकरणातील संशयितांची गळफास घेऊन पोलीस ठाण्यातच आत्महत्या अशा तीन घटनांच्या सातत्याने हे संपूर्ण प्रकरणच गंभीर वळणावर आले आहे. त्यात आज मयत तरुणांच्या मृत्यूची चौकशी करुन डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत वडार समाजाने आणि हल्ल्याचा निषेध करीत डॉक्टरांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर वेगवेगळे मोर्चे काढले.
आयएमएतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा
डॉ.रोहन मामुणकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करीत आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देखील मुकमोर्चा काढण्यात आला. येथील हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी आणि उर्वरित हल्लेखोरांना अटक करावी अशी प्रमुख मागणी यावेळी डॉक्टरांनी केली. यामोर्चात आयएमएचे डॉ. रवि वानखेडकर, डॉ.विनोद शाह, डॉ.अशोक तांबे, डॉ. पार्थिव संघवी, डॉ.मंगेश पाटे, डॉ.निसार शेख, डॉ.भुपेश चावडा, डॉ.गिरीश मोदी, डॉ.विजया माळी, डॉ.सविता नाईक, डॉ.पंकज देवरे, डॉ.संदीप बियाणी यांच्यासह विद्यार्थी आणि डॉक्टर सहभागी झाले.
रात्री उशीरा ठिय्या आंदोलन घेतले मागे
धुळ्यातील निवासी अस्थिरोग तज्ञ डॉ. रोहन मामुनकर यांना जमावाने बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी 25 जणांवर गुन्हा दाखल करीत 9 जणांना अटक केली. काल या आरोपींपैकी प्रदीप वेताळ या तरुणाने शहर पोलिस ठाण्यात गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मयत प्रदीप वेताळच्या नातेवाईकांसह वडार समाज बांधवांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले. पोलिस अधिक्षकांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्याने रात्री उशिरा वडार समाजाच्या मंडळीनी आंदोलन मागे घेतले.
या पार्श्वभूमीवर ’सीआयडी’चे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड,उपअधीक्षक गणेश चौधरी आणि पाच कर्मचार्यांचे पथक धुळे शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. तळ ठोकुन असलेल्या या पथकाने घटनेची प्राथमिक माहिती घेत अनेक महत्वपूर्ण बाबी नोंदवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे हे चौकाशीनंतरच स्पष्ट होणार असले तरी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची प्रथिमिक चौकशी सुरु झाली आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
प्रदीपचे ’इन-कॅमेरा’ शवविच्छेदन
आज सकाळी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर, महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत ’इन-कॅमेरा’ प्रदीपचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाने चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकार्यांकडून मिळाल्याने केवळ आश्वासनांचा अटीवर प्रदीपचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेण्याचे मान्य केले. तसेच वडार समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालावर मोर्चा काढण्यात आला. वडार समाज संघटनेचे व्ही.एस.गुंजाळ, अरुण पांडुरंग लष्कर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून डॉक्टर रोहन मामुणकर हे घटनेच्या रात्री दारुच्या नशेत होते आणि त्यांनी शिवीगाळ करीत उपचार करण्यास नकार दिल्यानेच तरुणांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या गैरवर्तवणुकीमुळे आणि दुर्लक्षामुळे अपघातग्रस्त तरुणाचा मृत्यू झाल्याने कारवाईची मागणी केली.