धुळ्यात विद्यार्थी संघटना रस्त्यावर

0

धुळे । धुळ्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्र जागेचा प्रस्ताव फेटाळून लावल्याच्या व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करून विद्यार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेणार्‍या सरकारचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या असून अभाविपने बुधवारी रास्ता रोखला तर युवासेना आज, गुरुवारी आंदोलन करणार आहे. धुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करत असून हा अन्याय दूर करावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

महापौरांची घेतली भेट

उमविच्या उपकेंद्राच्या ठरावाबाबत पुन्हा युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी भेट घेतली. यामध्ये महापालिकेच्या महासभेदरम्यान झालेल्या ठरावाबाबत चर्चा झाली. या संदर्भात महापौरांनी देखील अनुकूलता दाखवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे युवासेनेने सांगितले आहे.

अभाविपने रोखला रास्ता; कार्यकर्त्यांना अटक

धुळ्याचा हक्क असलेले कृषी विद्यापीठ निर्णय प्रलंबित अद्याप प्रलंबित आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्र जागेचा प्रस्ताव फेटाळून धुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अभाविपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही शासकीय इंजिनियरिंगचे स्वागत करतो मात्र तंत्रनिकेतन बंद करू नये. अन्य शहरांमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग असे दोन्ही महाविद्यालय सुरु असतांना धुळ्यालाच वेगळा न्याय का? असे म्हणत अभाविपने रास्ता रोको केला. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सुटका केली. आंदोलनात प्रदेश सहमंत्री धनश्री चान्दोडे, शहराध्यक्ष नितीन ठाकूर, जिल्हा संयोजक योगेश थोरात, रोहन अग्रवाल, पिनु मोहिते, महेश निकम, जोत्स्ना पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

युवासेना करणार आंदोलन

फडणवीस सरकार धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे, असा आरोप करत धुळे युवासेना आज, गुरुवारी रस्त्यावर उतरणार आहे. उत्तर महाराष्ट्र उपकेंद्र जागेबाबत असो, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्याया बाबत असो, कृषी विद्यापीठाबाबत असो असे निर्णय विरोधात घेऊन धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करताहेत याचा निषेध म्हणून युवासेना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे. उमवि उपकेंद्रासाठी देवपूर सर्व्हे नं. १११ व ११२ हि जागा द्यावी यासाठी महासभेत पुन्हा ठराव आणून द्यावी अशी मागणी महापौर व आयुक्तांकडे करणार असल्याचे युवासेनेने सांगितले आहे. तर या निर्णयामुळे भाजपा सरकारचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता विरोधात निर्णय घेणार्‍या भाजपा सरकारचा निषेध म्हणून धरणे आंदोलन करणार असून 16 तारखेला हजारो विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून भाजप सरकारचा निषेध रॅली मोर्चा काढणार असल्याचे युवासेना जिल्हा युवा अधिकारी अ‍ॅड.पंकज गोरे यांनी सांगितले आहे.