धुळ्यात श्वान पथकातील ’जॅक’मुळे तीन चोरट्यांना अटक

0

धुळे- जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकात नव्याने दाखल झालेल्या जॅक श्वानामुळे देवपुरातील घरफोडीची उकल झाली आहे. जॅकने दाखवलेल्या मार्गामुळे देवपूर पोलिसांनी काही तासातच तिघांना ताब्यात घेतले. सागर करनकाळ, जगन्नाथ मोरे, किशोर गावंडे अशी त्यांची नावे आहेत. याबाबत शकील शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. विशेष म्हणजे हे तिघेही शेख यांच्या गल्लीत राहणारे आहेत. या तिघांना रविवारी धुळे न्यायालयात उभे करण्यात आले.
न्यायालयाने या तिघांची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली.

चोरीचा उलगडा : आरोपींना तीन दिवस कोठडी
शहरातील एकवीरादेवी मंदिरापासून जवळ असलेल्या भाई मदाने नगरातील शकील शेख गुलाम दस्तगीर शेख (वय 36) यांच्याकडे चोरी झाली होती. घर व पुढील बाजूस असलेल्या त्यांच्या छोटेखानी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 70 हजार रुपये रोख, पाच हजार रुपयांची कर्णफुले व गल्ल्यामधील अंदाजे दीड हजार रुपये असा एकूण 76 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला होता. घटनेनंतर काही वेळातच देवपूर पोलिस व मुख्यालयातून श्वान पथक मागवण्यात आले. पोलिस दलात नव्यानेच आलेला जॅक हा श्वानही पथकात होता. चोरीच्या तपासात निपुण असलेल्या जॅकला शेख यांच्या घरात पडलेला डबा, गल्ल्याचा गंध देण्यात आला. घरात काही वेळ घुटमळल्यानंतर जॅक बाहेर आला. काही वेळ तो गल्लीत फिरला. या वेळी एक-दोन ठिकाणी त्याने पोलिसांना चोरट्यांचे संकेतही दिले. यानंतर जॅकने मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला. शिवाय एका दुकानाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यापर्यंत पोलिसांना नेले. जॅकने दिलेल्या संकेतामुळे चोरीमागे गल्लीतील कोणी तरी असावे या पोलिसांच्या शंकेला बळ मिळाले. त्यामुळे त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला. पोलिसांनी परिसरात एका ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर मध्यरात्री मुख्य रस्त्याने जाताना सागर देविदास करनकाळ (वय 25), जगन्नाथ दामू मोरे (वय 28), किशोर गावंडे (वय 32 तिघे रा. भाई मदाने नगर) हे दिसून आले. त्यामुळे रात्रीतून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांकडून पैसेही जप्त करण्यात आले, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांना रविवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने या तिघांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.