भुसावळ/धुळे : शहरात अपना बेकरी समोर प्रतिबंधीत असलेल्या मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत विक्रेत्याच्या मुसक्या बांधल्या शिवाय 13 हजार 950 रुपये किंमतीच्या मांजासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी नायलॉन मांजा विक्रेता अताउर रहिमान एकलाख अहमद यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधीत मांज्याची विक्री
नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरीकांना गंभीर दुखापती घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी संक्रांतीचे दिवस पाहता पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजावर बंदी आणण्यात आली आहे मात्र तरीदेखील काही विक्रेते हा मांजा विकत असल्याने त्यावर कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले होते. अकबर चौकात अपना बेकरी समोरील पतंग विक्रेता अताउर रहिमान एकलाख अहमद (27, रा.अपना बेकरी समोर, धुळे) हा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 360 नग छोटे नायलॉन मांजाचे रोल, 33 नग नायलॉन मांजाचे प्लॉस्टीक बंडल, दोन नग नायलॉन मांजाचे सिल्व्हर रंगाची चकरी असा एकूण 13 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राउत, बाळासाहेब सूर्यवंशी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली.