धुळ्यात 32 वर्षीय विवाहितेचा खून : संशयीत पसार

धुळे : शहरातील 32 वर्षीय विवाहितेचा भर दिवसा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडल्याने शहरात खळबळ उडाली. शीतल भिकन पाटील (32, जगन्नाथ नगर, धुळे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शहरातील देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या जगन्नाथनगर भागात ही घटना घडली. दरम्यान, खून हा मयत विवाहितेच्या पतीच्या मित्राने केल्याचा पोलिसांना संशय असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पती घराबाहेर पडताच केला खून
देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगन्नाथ नगर भागात भिकन पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी भिकन पाटील हे मुलांसह घराबाहेर गेल्याने त्यांच्या पत्नी शीतल पाटील या घरी एकट्याच होत्या. याचदरम्यान संशयीत आरोपीने त्यांच्या घरात शिरून महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. खुनाचे स्पष्ट कारण अद्याप स्पष्ट णालेले नाही. पश्‍चिम देवपूर पोलीस खुनाचा अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीत आरोपीचा शोध घेतला जात आहे.