Attal chain thieves in the net of Shanipeth police in Jalgaon जळगाव : शनीपेठ पोलिसांनी अट्टल चैन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी तब्बल नऊ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. कुसुंबा व कासमवाडीत येथे बुधवार, 19 ऑक्टोबर रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (26, प्रजापत नगर, ममुराबाद रोड, जळगाव) व दीपक रमेश शिरसाठ (26, वरखेडी, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अकोल्यात चैन लांबवण्याची घडली होती घटना
अकोला शहरातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रम आटोपून महिला दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात तीन जणांनी दुचाकीवर येत धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची 35 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला होता. या संदर्भात अकोला जिल्हा सिव्हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अकोला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी केली असता यातील संशयित आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार तेथील पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी संपर्क साधला होता.
अखेर आरोपींना बेड्या
पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल परीस जाधव, पोलीस नाईक विजय निकम, अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील यांनी कारवाई करत संशयीत आरोपी आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (26, प्रजापत नगर, ममुराबाद रोड, जळगाव) याला कुसुंबा येथून तर दीपक रमेश शिरसाठ (26, वरखेडी, ता.पाचोरा) यास कासमवाडीतून अटक केली आहे. एक संशयीत लोकेश महाजन (खेडी, ता.जळगाव) हा पसार असून या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी (एम.एच. 14 के.जी.7199) जप्त करण्यात आली. अटकेतील दोन्ही संशयित आरोपींना अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांनी नऊ चैन चोरींची कबुली दिली आहे.