Smoke style mobile theft from two-wheeler in Jalgaon : Thieves have been caught जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धूम स्टाईल मोबाईल चोरट्यांच्या जामनेर तालुक्यातून बुधवारी दुपारी मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींनी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व शिव कॉलनी परीसरात चोरीची कबुली दिल्याने आरोपींना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशाल दिनकर सपकाळ (23, रा.शास्त्रीनगर, जामनेर), आकाश कडू आल्हाट (22, शिवाजीनगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
धूम स्टाईल केली होती चोरी
शिवकॉलनी परीसरातून पायी जाणार्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपी हे जामनेर तालुक्यातील असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पथकातील हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, संदीप साबळे, विजय पाटील, अविनाश देवरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, सचिन महाजन, किरण धनगर यांच्या पथकाने बुधवार, 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 जामनेर शहरातून अरोपी विशाल दिनकर सपकाळ (23, रा. शास्त्रीनगर, जामनेर), आकाश कडू आल्हाट (22, शिवाजीनगर, जामनेर) यांना अटक केली आहे. त्यांनी त्यांचा साथीदार योगेश सोनार (जामनेर) याच्या मदतीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयीत आरोपींना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.