कोल्हापूर: संपूर्ण राज्यात चर्चेत राहिला तो जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव. त्यांचा पराभव करत विजयी झालेले शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. निकाल लागल्यानंतर सर्व मतभेद विसरत धैर्यशील माने राजू शेट्टींच्या भेटीसाठी त्यांच्या घऱी पोहोचले. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्या आईचे आशिर्वाददेखील घेतले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचाराची मैदाने गाजवली होती. पण निकाल लागल्यानंतर नेतेमंडळी आपापसातील मतभेत विसरुन एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. असंच काहीसं चित्र हातकणंगलेत पहायला मिळालं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी राजू शेट्टींचा पराभव केला ते धैर्यशील माने आज त्यांच्या घरी भेटीला पोहोचले.