धोकादायक इमारतींची दुरुस्ती रखडली

0

पुणे । पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अजुनही 32 इमारती धोकादायक आहेत. दरम्यान या धोकादायक इमारतीच्या मालकांना बोर्डाच्या बांधकाम विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र इमारत मालक आणि भाडेकरू यांच्या वादात या इमारतीची दुरुस्ती रखडली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या धोकादायक इमारतींचे बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यापुर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार आठही वॉर्डात सुमारे 32 इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले. पावसाळ्याच्या दिवसात खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीच्या मालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या.

मालक आणि भाडेकरुंचा वाद
दरम्यान, इमारत मालक आणि भाडेकरूंच्या वादात दुरूस्ती रखडली. भाडेकरु घरे सोडण्यासही तयार नाहीत. परिणामी, धोकादायक असलेल्या इमारती अतिधोकादायक होत चालल्या असून, त्या केव्हा कोसळतील याची कोणतीही शाश्‍वती देता येत नाही. त्यामुळेच धोकादायक असलेल्या इमारती पाडाव्यात अगर त्यांची योग्य दुरूस्ती करावी, असे प्रशासनाच्या बांधकाम विभागाने नोटिसींच्या माध्यमातून संबधित इमारत मालकांना कळविण्यात आले आहे.

नवी इमारत बांधण्याची परवानगी
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाने सन 2015 साली काढलेल्या परिपत्रकानुसार (जी.आर.) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जेवढ्या मजल्यांची इमारत तेवढीच नवीन इमारत बांधण्यासाठी एफ. एस. आय. देण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यत सुमारे 25 इमारतीचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यामधील बहुतांशी इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे.