नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या हद्दीत अनेक इमारती जुन्या आणि मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे अपघाताची भीती आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर, मुंबईप्रमाणे आपल्या शहरातही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. या विषयासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
इमारत मालकांचा हलगर्जीपणा
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या गावठाणांमध्ये अनेक इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत. अशा इमारतींच्या मालकांना नोटिसा देऊनही त्याची दखल मालकांनी घेतलेली नाही. तर काही इमारती मूळ मालक व भाडेकरू अशा वादात अडकल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका असा झपाट्याने बदल होत गेला असला तरी जुन्या गावठाणामध्ये अशा अनेक धोकादायक इमारती घोषित केलेल्या आहेत. तरी काही जीवितहानी होण्याअगोदर स्थापत्य विभागास सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भोईर यांनी निवेदनातून केली.