धोकादायक गावांसाठी 4 कोटींचा निधी

0

पुणे । कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) टीमने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील 26 गावे धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. त्यांची यादी सीओईपी ने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे दिली असून, या गावांत आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने 4 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

माळीण येथील दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील माळीणसदृश गावांची पाहणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार सीओईपीच्या टीमने जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड, भोर, मुळशी आणि वेल्हा या तालुक्यांत जाऊन धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले. यात सर्वाधिक आंबेगाव तालुक्यावतील गावांचा त्या खालोखाल मावळ, भोर आणि खेड तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आंबेगाव तालुक्यातील भागवतवाडी येथील पुलावडे, पसारवाडी, असणे, केळेवाडी, जांभोरी, भेदरवाडी. मावळातील तुंग, ताजे, बोरज. भोरमधील पांगारी, जांभूळभवाडी येथील कोराळे, देहेन, दानवली. खेडमधील पांढर वस्ती, भोरगिरी, सावळे, भुमाळे. वेल्हेतील आंबवणे, घोळ, जुन्नरमधील तळमाचीवाडी, मुळशीतील घुटके गावांचा यात समावेश आहे. अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती दरड कोसळणे, भूस्खलनाचा धोका या गावांना आहे. या गावातील आपत्तीव्यवस्थापनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.