पालघर । धोकादायक झालेली जिजामाता भाजी मंडई इमारत सोडण्याच्या नोटीस बजावूनही या धोकादायक इमारतीमध्ये व्यवसाय करत असलेल्या भाजी विक्रेत्यांना व दुकानदारांना बाहेर काढून पालिकेने या इमारतीला अखेर टाळे ठोकले आहे. महाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिकेच्या मालकीची जिजामाता भाजी मंडईची इमारत 1985 मध्ये बांधण्यांत आली. इमारतीच्या आतील भागांमध्ये 53 गाळे बांधण्यांत आले तर बाहेरील बाजुस 15 दुकानगाळे बांधण्यांत आले. त्यानंतर पालिकेने भाडेतत्वावर व्यापार्यांना गाळे वितरीत केले. तळ मजल्यावर दुकानाचे गाळे आणि पहिल्या मजल्यावर महात्मा ज्योतिबा फूले सभागृह बांधण्यांत आले. सभागृहाच्या बाजुला असलेल्या दोन खोल्यांमध्ये शिक्षण विभागाचे कार्यालय सुरु करण्यांत आले. मात्र तळमजल्यावर असलेल्या 57 गाळ्यांपैकी 20 गाळे वापरांत होते बाकीचे सर्व गाळे रिकामे राहीले होते.
गाळेधारक आणि अधिकार्यांमध्ये बाचाबाची
गाळेधारकांनी पर्यायी जागा पालिकेने उपलब्ध करुन दिल्याशिवाय गाळे ताब्यात देणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर पालिका प्रशासनाने इमारती मधील सर्व गाळे धारकांना गाळे व दुकाने मोकळे करण्याची कारवाई केली. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तसेच इमारत पाडण्यासाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री तैनात ठेवण्यांत आली होती. अखेर दोंन तासाच्या प्रयत्नांनंतर इमारती मधील सर्व गाळे दुकाने मोकळे करण्यात पालिका प्रशासनाला यश आले. गाळेधारक ,पालिकेच्या अधिकार्यांमध्ये बाचाबाचीझाली परंतु कायदेशीर मार्गाने कारवाई केली जात असल्याने गाळेधारकांना अखेर आपली दुकाने मोकळी करुन द्यावी लागली.