मुंबई । मुंबई महापालिकेच्या काही शाळा धोकादायक स्थितीत आहेत. अशा शाळांच्या डागडुजी किंवा दुरुस्तीवर प्रशासन भर देते. अल्पावधीनंतर त्या धोकादायक बनतात, त्यामुळे अशा शाळांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी पुनर्बांधणी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीत लावून धरली. अखेर पुनर्बांधणीचा नव्याने प्रस्ताव आणण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
महानगरपालिकेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. अनेक शाळा धोकादायक व मोडकळीस आलेल्या आहेत. तीस वर्षाहून अधिक कालावधी असणार्या इमारतींना स्टक्चरल ऑडिट करून धोकादायक ठरविण्यात येतात. मात्र 90 वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थी जीव धोक्यात मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. एफ उत्तर विभागातील विद्यामान के.सी. माटूंगा महापालिकेच्या शाळेला 96 वर्ष ेपूर्ण झाली आहेत. तरीही प्रशासनाने शालेय इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी अडीच कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला. सर्वपक्षिय नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी धोकादायक शाळांची परिस्थिती व समस्यांकडे समितीचे लक्ष वेधले. वर्षोनुवर्षे जुन्या असलेल्या इमारतींच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी त्यांची पुनर्बांधणी करावी, यावेळी करण्यात आली. पुनर्बांधणीचा प्रस्ताव नव्याने तयार करण्याच्या सूचना समिती अध्यक्ष जाधव यांनी देत सदर प्रस्ताव परत पाठवला.