अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेसला आगीच्या अफवेने यंत्रणेला मनस्ताप

धोक्याचा लाल इंडिकेटर अन् यंत्रणेची जळगावात तारांबळ

जळगाव : डाऊन 19483 अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेसमधील एका डब्यात धोक्याचा लाल इंडिकेटर लागताच कुणीतरी वेस्टर्न रेल्वेला गाडीला आग लागल्याची माहिती दिली अन् पाहता पाहता सर्वदूर ही अफवा पसरली. जळगाव रेल्वे स्थानक येण्यापूर्वी ही घटना घडली असलीतरी जळगाव रेल्वे स्थानकावर मात्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. प्रत्यक्ष पाहणी अंती व्हील जाम झाल्याने लाल इंडिकेटर लागल्याची बाब उघड झाल्याची माहिती अधिकृत रेल्वे सूत्रांनी दिली. या प्रकारानंतर यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला मात्र आगीच्या अफवेमुळे रेल्वे यंत्रणेला मोठ्या अफवांचा सामना करावा लागला.

उन्हाळ्यात घडतात घटना
रविवारीदेखील मध्यप्रदेशातील नेपानगर रेल्वे स्थानकावर अप कर्नाटक एक्स्प्रेस उभी असतानाच एस- 2 डब्यातील चाकांमधून धूर निघाल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. वाढत्या उन्हामुळे गाडीच्या डब्यातील एक्सल तापल्यामुळे हा प्रकार घडल्याचे यावेळी उघड झाले होते तर नागरीकांनी पाणी आणि अग्निरोधक यंत्राद्वारे तातडीने आग लागण्यापूर्वीच विझवली होती. दरम्यान, सोमवारी डाऊन 19483 अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेसच्या एस- 7 या डब्यात धोक्याचा लाल इंडिकेटर लागला व प्रवाशांमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. कुणीतरी जळगाव स्थानकासह वेस्टर्न रेल्वेला गाडीला आग लागल्याची माहिती दिल्यानंतर यंत्रणा पुरती हादरली व आग विझवण्यासाठी सज्जही झाली.

जळगावच्या महापौरही सरसावल्या
घटनेची माहिती कळताच महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील रेल्वे स्थानकावर आल्या तर जळगाव मनपाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, फायरमन अश्वजित घरडे, तेजस जोशी, वाहन चालक वसंत न्हावी, भारत बारी, रवी बोरसे, नितीन बारी, वाहन चालक नारायण चांदेलकर, शिवा तायडे, पुंडलिक सपकाळे, वाहन चालक विक्रांत घोडेस्वार, सोपान कोल्हे, निलेश सुर्वे, नंदकिशोर खडके यांच्यासह घटनास्थळी तीन अग्निशमन बंब तैनात करण्यात आले मात्र आग लागली नसल्याची बाब उघडकीस येताच यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला.